पेंधर उड्डाणपुल वाहतुकीसाठी खुला होण्याची नागरिकांना प्रतीक्षा

खारघर : दिवा-पनवेल रेल्वे मार्गावरील पेंधर उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून, सिडको प्रशासनाने पेंधर उड्डाणपुल वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी तळोजा मधील नागरिकांकडून केली जात आहे.

तळोजा फेज-२ वसाहत मधील रहिवाशी आणि पेंधर ग्रामस्थांना दिवा-पनवेल मार्गावर धावणाऱ्या रेल्वेमुळे वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे पेंधर रेल्वे फाटकवर होणारी वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी ‘सिडको'ने  दिवा-पनवेल रेल्वे मार्गावरील रेल्वे  ट्रॅकवर उड्डाणपुल उभारणीच्या कामाला २०१२ मध्ये सुरुवात केली होती. मात्र, सदर पुलाचे काम करताना असंपादित  जमिनीचा  वाद निर्माण झाल्यामुळे जवळपास १० वर्षे पेंधर उड्डाणपुलाचे काम रखडले होते. परंतु, आता पेंधर उड्डाणपुल उभारणीचे काम पूर्ण झाले असून, पेधर उड्डाणपुल रात्री प्रकाशात न्हाऊन निघण्यासाठी पुलाच्या दुभाजकात ३० विद्युत पोल उभारण्यात आले आहेत. याशिवाय दिवा-पनवेल मार्गावरील पेंधर रेल्वे फाटक पादचाऱ्यांना ओलांडता येण्यासाठी रेल्वे ट्रकच्या दोन्ही बाजूला उड्डाणपुलाला लागून लोखंडी  पादचारी पूल उभारण्यात आला आहे. त्यामुळे ‘सिडको'ने पेंधर उड्डाणपुल वाहतुकीसाठी सुरु करावा, अशी मागणी तळोजा मधील नागरिक करीत आहेत.

दरम्यान, पेंधर उड्डाणपुल वाहतुकीसाठी खुला करण्याबाबत सिडको प्रशासन निर्णय घेणार आहे, असे तळोजा विभाग वाहतुक नियंत्रण अधिकारी दिलीप चव्हाण यांनी सांगितले. दुसरीकडे,

पेंधर उड्डाणपुल उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. पेंधर उड्डाणपुलावरुन तळोजा वसाहतीत प्रवेश करताना आणि बाहेर पडताना पनवेल आणि मुंब्रा कडे जाणाऱ्या रस्त्यालगत वळणदार रस्त्यावर वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होवू नये यासाठी योग्य रस्ता तयार करुन लवकरच पेंधर उड्डाणपुल वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे, असे स्पष्टीकरण सिडको अधिकाऱ्यांनी दिले आहे.

मद्यपींचा सुळसुळाट
पेंधर उड्डाणपुलावर असलेली मोकळी जागा तसेच पथदिव्यांची सोय असल्यामुळे रात्री काही मद्यपी उड्डाणपुलावर मद्यपान करीत असल्याचे परिसरातील नागरिक सांगत आहेत. काही दिवसांपूर्वी  रिक्षाचालक रात्री रिक्षात एका तरुणीला घेवून जात असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास येताच रिक्षा चालकाने सदर तरुणीला पुलावर सोडून रिक्षा घेवून पलायन केल्याची तसेच सदर तरुणी  पादचारी पुलावरुन खाली उतरुन निघून गेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे  पेंधर उड्डाणपुल ‘सिडको'ने वाहतुकीसाठी तात्काळ खुले करावा, अशी मागणी पेंधर मधील नागरिकांकडून केली जात आहे.

दिवा-पनवेल रेल्वे मार्गावरील पेंधर उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यामुळे पुलाखाली असलेले  रेल्वे फाटक रेल्वे विभागाकडून बंद केले जाणार आहे. पेंधर उड्डाणपुल वाहतुकीसाठी लवकरात लवकर खुला करावा, या मागणीचे पत्र रेल्वे प्रशासनाने सिडको प्रशासनाला दिले आहे, असे समजते.

पेंधर रेल्वे फाटकावर नागरिकांना पंधरा ते वीस मिनिटे उभे रहावे लागत आहे. तळोजा-पेंधर उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून, सदर उड्डाणपुल वाहतुकीसाठी लवकरात लवकर खुला करण्याची आवश्यकता आहे. राजकीय नेते मंडळींना वेळ मिळत नसल्याने पेंधर उड्डाणपुलाचे उद्‌घाटन होण्यास विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे.- ॲड. अशोक पोटे, रहिवासी - तळोजा फेज २. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

जय जवान जय किसान विषयावर ‘संवेदना चॅरिटेबल संस्था पनवेल'चा महिलादिन साजरा