अंबरनाथमध्ये १० बंधबिगार कामगारांची सुटका

अंबरनाथ : एकविसाव्या शतकातही बंधबिगार पध्दती अस्तित्वात असल्याचे धक्कादायक वास्तव अंबरनाथमध्ये उघडकीस आले असून, ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने मे. शक्ती फुड इंडस्ट्रीज या कंपनीवर धडक कारवाई केली आहे. या कारवाईत उत्तर प्रदेशातील १० परप्रांतीय कामगारांची अमानुष छळातून सुखरुप सुटका करण्यात आली.

या प्रकरणाची वाचा कमलेश बनवासी या कामगाराने स्वतःची सुटका करुन घेत ‘जिल्हा विधी सेवा प्राधिकरण'शी संपर्क साधल्यानंतर फुटली. ‘प्राधिकरण'चे सचिव न्यायमूर्ती रवींद्र पाजणकर यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला आणि निवडणुकीच्या व्यस्त कामातही प्रशासनाने अत्यंत वेगाने हालचाली करून या कामगारांची मुक्तता केली.

निक्की उर्फ कृष्णा कुमार अग्रहारी आणि नितीन तिवारी या २ ठेकेदारांनी उत्तर प्रदेशातील भदोही आणि जौनपूर भागातील तरुणांना १८ ते २० हजारांच्या पगाराचे आणि राहण्या-खाण्याच्या सोयीचे आमिष दाखवून अंबरनाथ पश्चिम येथील कंपनीत कामाला लावले होते. मात्र, प्रत्यक्षात या कामगारांना अत्यंत नरकयातना भोगाव्या लागल्या. त्यांना दिवसा जड कामे करायला लावून रात्री लहान खोलीत कोंडून बाहेरून कुलूप लावले जात असे. त्यांचे मोबाईल फोन जप्त करुन नातेवाईकांशी संपर्क तोडण्यात आला होता. तसेच त्यांना अपुरे जेवण देऊन मारहाणही केली जात होती. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी, कामगार उपायुक्त संभाजी व्हनाळकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सैय्यद यांच्या संयुक्त पथकाने रात्री उशिरापर्यंत मोहीम राबवून पहाटे ५ वाजता या प्रकरणी गुन्हा दाखल केला.

या धडक कारवाईत दोन्ही ठेकेदारांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर बंधबिगार उच्चाटन अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेनुसार मानवी तस्करीची कलमे लावण्यात आली आहेत. सुटका झालेल्या सर्व १० कामगारांना अधिकृत बंधबिगार प्रमाणपत्र देऊन त्यांना त्यांच्या मूळ गावी सुखरुप रवाना करण्यात आले आहे. अशा प्रकारे आजही असंघटीत कामगारांचे शोषण होत असल्याचे समोर आल्याने, नागरिकांनी अशा घटना आढळल्यास ‘जिल्हा विधी सेवा प्राधिकरण'शी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

तळोजातील लॉजमध्ये देहव्यापाराचा पर्दाफाश