वडपे येथे गोदामांना भीषण आग
भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्गावरील भिवंडी तालुक्यातील वडपे येथील रिचलँड कॉम्प्लेक्स मधील भल्या मोठ्या गोदामास १२ मे रोजी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागण्याची घटना घडली आहे. या गोदाम संकुलात एकूण २२ गोदाम आगीच्या भक्षस्थानी पडले असून या गोदामात कपडे, बुट, केमिकल, इलेक्ट्रॉनिवस साहित्य मोठ्या प्रमाणावर साठवलेला कोट्यावधी रुपयांचा माल जळून खाक झाला आहे.
सदर आगीची माहिती मिळताच भिवंडी आणि कल्याण येथून प्रत्येकी २ अशा ४ अग्निशामक गाड्यांद्वारे पथकाने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे कसोशीने प्रयत्न सुरु केले. परंतु, पाण्याची कमतरता असल्याने आग विझवण्यास अडचण येत होती. केमिकल गोदामातील आग विझवण्यासाठी फोमचा वापर करण्यात आला.
येथील आगीचे कारण अजून अस्पष्ट असून, यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सदर ठिकाणी के. के. इंडिया पेट्रोलियम स्पेसियालिटीज प्रा.लि., कॅनन इंडिया प्रा.लि., ब्राईट लाईफकेअर प्रा.लि., होलीसोल प्रा.लि., एबॉट हेल्थकेअर प्रा.लि., डेकोरेशन साहित्याचे मोठे गोदाम आहेत. या गोदामात मोठ्या प्रमाणात केमिकल, प्रिंटींग मशीन, इलेक्ट्रॉनिक साहित्य, आरोग्य संबंधित प्रोटीन खाद्यपदार्थ पावडर, कॉस्मेटिक साहित्य, कपडे, बुट, मंडप-डेकोरेशन साहित्य आणि फर्निचर साठवण्यात आले होते. सदर सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर ८ तासांनी आग आटोक्यात आली असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले आहे. तर आग आटोक्यात आल्यानंतरही आजुबाजुच्या गोदामात काम करणाऱ्या कामगारांना धुरामुळे श्वसनास त्रास होत होता.