‘पनवेल-कर्जत लोकल कॉरिडॉर'ला डिसेंबरचा मुहूर्त

नवी मुंबई : मुंबई-एमएमआर उपनगरीय रेल्वे वाहतुकीचा विस्तार करणाऱ्या बहुउद्देशीय ‘पनवेल-कर्जत लोकल रेल्वे कॉरिडॉर'चे काम वेगाने सुरु आहे. या उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरवर टाकण्यासाठी खास डिझाईन केलेल्या रेल्वे पॅनल्सचा पहिला ईयुआर (एंड अनलोडिंग रेक) प्रकल्पाच्या ठिकाणी दाखल झाला. प्रकल्पासाठी आणि एमआरव्हीसीसाठी १५ मार्च २०२५ रोजीचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे.

‘सेल'ने (स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया) विशेषतः डिझाईन केलेले प्रत्येक रेल्वे पॅनल २६० मीटर लांब आहे आणि प्रतिमीटर ६० किलो वजनाचे आहे. सदर हेवी ड्युटी रेल्वे पॅनेल मोहापे आणि चिखले स्थानकांदरम्यान ७.८ कि.मी. अंतरावर कॉरिडॉरवर बसवले जाईल. या विशेष ट्रॅक जोडणीचे काम पूर्ण झाल्यानंतर, कर्जत आणि चौक स्थानकांदरम्यान रेल्वे ट्रॅक पॅनेल टाकण्याचे काम लवकरच सुरु होईल.

मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी म्हणजेच ‘पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडोर'चे काम वेगाने पुढे सरकत आहे. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रकल्पाचा हिस्सा असलेल्या या प्रकल्पासाठी जवळपास २,७८२ कोटींचा निधी खर्च करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे काम ऑक्टोबर २०२४ पर्यंत ६७ टक्के पूर्ण झाले आहे. 

उपनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर प्रकल्पाचे काम ‘मुंबई रेल्वे विकास निगम'कडे (एमआरव्हीसी) सोपवण्यात आले आहे. नवीन कॉरिडोरमुळे पनवेल आणि कर्जतच्या मध्ये फास्ट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबई महानगर प्रदेशातील कनेक्टिव्हिटीचा कायापालट होण्याची अपेक्षा आहे.

सदर प्रकल्पासाठी ५६.८२ हेक्टर खासगी जमीन आणि ४.४ हेक्टर सरकारी जमीनीचे भूसंपादन करण्यात आले आहे. या मार्गावर तीन बोगदे असून तिन्ही बोगद्यांचे काम लवकरच पूर्णत्वास येणार आहे. आहे. याशिवाय रेल्वेमार्गावर ४७ पुल असून  रोड ओवर ब्रिज ४ आहेत. मोहोपे आणि किरवलीसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी वेगाने काम सुरु आहे. पुणे एक्स्प्रेस-वे अंडरपासचे काम पूर्ण झाले आहे. 

पनवेल-कर्जत रेल्वे प्रकल्प...
पनवेल-कर्जत रेल्वे मार्गावर एकूण ५ स्थानके असणार आहेत. पनवेल, चिखले, मोहापे, चौक आणि कर्जत स्थानकांत वेगाने काम सुरु आहे. प्लॅटफॉर्म, फुट ओव्हर ब्रिज आणि प्रशासकीय कार्यालय सारख्या सुविधांवर काम प्रगतिपथावर सुरु आहे. डिसेंबर-२०२५ पर्यंत सदर प्रकल्प पूर्ण होणार आहे. या प्रकल्पामुळे कर्जतहून थेट सीएसएमटी व्हाया पनवेल मार्गे जाता येणार आहे. कर्जत कडील प्रवाशांना पनवेल वरुन हार्बर मार्गाने मुंबई सीएसएमटी स्थानक गाठता येणार आहे. यामुळे प्रवाशांची २५ मिनिटांची बचत होणार आहे. या प्रकल्पामुळे पनवेल ते कर्जत दरम्यान असलेल्या परिसराचा विकास होण्यासही मदत मिळणार आहे.  

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘सिडको'क़डून एलआयजी गटाच्या घरांचे क्षेत्रफळ कमी