प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
पावसाळ्यासाठी सिडको प्रशासन सज्ज!
नवी मुंबई : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी सिडको महामंडळाने कंबर कसली आहे. १ जून ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत सिडको कार्यक्षेत्रात २४े७ आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, नागरी समस्या सोडवण्यासाठी विविध उपाययोजनांचे नियोजन करण्यात आले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर २०१८ पासून राबवण्यात येणारी ही यंत्रणा यंदा अधिक सुसज्ज करण्यात येणार आहे. नुकतीच सिडकोच्या मुख्य दक्षता अधिकाऱ्यांच्या दालनात विभाग प्रमुखांची महत्त्वाची बैठक पार पडली, ज्यामध्ये आपत्ती निवारणासाठी सविस्तर आराखडा तयार करण्यात आला.
सिडकोच्या ‘डिझास्टर मॅनेजमेंटे'मध्ये नियंत्रण कक्षासाठी व्हॉट्सॲप ग्रुप, सीसीटीव्ही आणि एकमेकांशी संपर्कासाठी वॉकीटॉकीची सोय करण्यात आली आहे. आपत्तीग्रस्त नागरिकांसाठी रुग्णवाहिका आणि खाटांची उपलब्धता ठेवण्यासाठी रुग्णालयांशी समन्वय साधला जात आहे. पाणी साचणाऱ्या सखल भागात पाण्याचा निचरा करण्यासाठी हाय-पॉवर पंप तैनात करण्यात आले आहेत. रेल्वे स्थानकांच्या भुयारी मार्गांत पाणी साचू नये, यासाठी विशेष दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अग्निशमन दलाचे मनुष्यबळ, उपकरणे आणि वाहने सज्ज ठेवण्यात आली असून, गरज भासल्यास नागरिकांच्या बचावासाठी बोटींचीही व्यवस्था देखील करण्यात आली आहे. त्याशिवाय शॉर्ट सर्कटिच्या घटना हाताळण्यासाठी महावितरणशी समन्वय राखला जाणार आहे.
नागरिकांना पावसाळ्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सिडकोचे सर्व विभाग समन्वयाने काम करत आहेत. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आमची यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. असे सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
या नियोजित बैठकीस मुख्य अभियंता (न.मुं) प्रभाकर फुलारी, मुख्य अभियंता (विमानतळ) शीला करुणाकरण, जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे, मुख्य अग्निशमन अधिकारी विजय राणे, सुरक्षा अधिकारी के.ए. गायकवाड यांच्यासह विद्युत, प्रणाली आणि आस्थापना विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास नागरिकांनी सिडकोने प्रसिद्ध केलेल्या नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.