पद्मश्री शंकर महादेवन यांच्या सुरांनी सजला नवी मुंबई सांस्कृतिक कला महोत्सव

नवी मुंबई : श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था आणि सिडको आयोजित ‘नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सव-२०२६' अंतर्गत हिंदी गीतांच्या कार्यक्रमाप्रसंगी सुप्रसिद्ध गायक पद्मश्री शंकर महादेवन यांच्या सुरेल आवाजाने संगीत सोहळ्याला अविस्मरणीय उंची मिळाली. आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात शंकर महादेवन यांच्या गाण्यांनी संपूर्ण मैदान मंत्रमुग्ध झाले. तसेच शास्त्रीय संगीताचा गाभा, सुगमतेची मधुरता आणि भावनांची खोल अनुभूती यांचा सुरेल मिलाफ त्यांच्या प्रत्येक गीतातून अनुभवायला मिळाला. त्यांच्या दमदार आणि भावस्पर्शी सादरीकरणाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. एकामागून एक सादर होत गेलेली हिंदी आणि मराठी सदाबहार गीते ऐकताना प्रेक्षक अक्षरशः संगीताच्या प्रवाहात वाहून गेले होते. संगीतप्रेमींनी दिलेली उस्फुर्त दाद त्यांच्या कलेप्रती असलेल्या अपार प्रेमाची साक्ष होती. या संगीत मैफिलीतून कला, संस्कृती आणि संगीताचा खरा आत्मा अनुभवता आला. संगीत सोहळा शंकर महादेवन यांच्या सुरेल गायनामुळे उपस्थित सर्व रसिकांच्या मनात कायमचा ठसा उमटवून गेला आणि नवी मुंबईच्या सांस्कृतिक इतिहासात एक अविस्मरणीय पर्व ठरला.

तसेच नृत्य कला, साहित्य आणि क्रीडा क्षेत्रातील कलाकार लावणी सम्राट आशीमिक आनंद कामठे, लावणी कलाकार कांचन रमेश फाळके, कवयित्री तथा नवी मुंबई महापालिका माजी सचिव चित्रा बाविस्कर यांचा श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या वतीने ‘गौरव सन्मान पुरस्कार' देऊन सन्मान करण्यात आला.       

याप्रसंगी आ. मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, माजी नगरसेवक अशोक गुरखे, माजी नगरसेवक निलेश म्हात्रे, माजी नगरसेविका अनिता शेट्टी, ज्येष्ठ कार्यकर्ता गोपाळराव गायकवाड, समाजसेवक दिलीप पाटील, मंडळ अध्यक्ष अजय सिंग, मनिष बिजलानी, प्रदीप कारिया तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महिला पालकांना शाळेने दिले स्वच्छतेचे वाण