टिटवाळा मध्ये ५ लाखांची वीज चोरी
कल्याण : ‘महावितरण'च्या कल्याण ग्रामीण विभागात येणाऱ्या टिटवाळा, इंदिरानगर, गणेशवाडी, बल्लाणी परिसरात अनधिकृतपणे तसेच सर्व्हीस वायरमध्ये छेडछाड करुन वीज वापर करणाऱ्या २५ वीज चोरांना ‘महावितरण'ने दणका दिला आहे. या वीज चोरांनी ५.१२ लाख रुपयांची वीज चोरी केली असून वीज चोरांच्या विरोधात वीज कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘महावितरण'कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कल्याण ग्रामीण विभागात येणाऱ्या बल्लाणी, इंदिरानगर, गणेशवाडी, टिटवाळा परिसरात मोठ्या प्रमाणात वीज चोरी होत असल्याची माहिती मिळाली होती. टिटवाळा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता गणेश पवार यांनी पथक तयार करुन वीज मीटर तपासणी मोहीम हाती घेतली. यावेळी वीज चोरी करणाऱ्या व्यक्ती वीज मीटर असून देखील वीज चोरी करीत असल्याचे आढळून आले. तसेच काहीजण सर्व्हीस वायरमध्ये छेडछाड करून अनधिकृतपणे वीज वापर करीत असल्याचे आढळून आले. अशा प्रकारे ‘महावितरण'च्या टिटवाळा उपविभागातील मांडा ग्रामीण शाखा कार्यालय अंतर्गत २५ ठिकाणी वीज चोरी होत असल्याचे आढळून आले. ‘महावितरण'कडून वीज चोरीचे मुल्यांकन केले असता वीज चोरांनी २३,०१७ युनिट वीज चोरी केल्याचे आढळून आले. याचे मुल्यांकन केले असता ५ लाख १२ हजार रुपये आहे.
वीज चोरी करणे दंडनीय अपराध आहे. गुन्हा सिध्द झाल्यास कठोर कारावास आणि आर्थिक दंडाची तरतूद वीज कायद्यात करण्यात आली आहे. सदरची कारवाई महावितरण कल्याण परिमंडळ मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा, कल्याण-२ मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता व्ही.एस. फुंदे, कार्यकारी अभियंता विनय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अभियंता गणेश पवार, सहाय्यक अभियंता निलेश शिर्के, शाखा अभियंता तुकाराम घोडविंदे, धनंजय पाटील, सचिन पवार, योगेश चेंदवणकर यांनी पार पाडली.