ठाणे-बेलापूर रोडवरील पाईपलाईन स्थलांतरीत करण्याचे काम सुरु

वाशी : ठाणे-बेलापूर रोडवरील मागील १५ वर्षांपासून बहुप्रतिक्षित तुर्भे स्टोअर पुलाच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर रस्त्याखालून गेलेल्या पाण्याच्या पाइपलाईनमुळे कामात अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे पुलाचे काम तात्पुरते थांबवण्यात आले होते. मात्र, आचारसंहिता संपताच आता रस्त्याखालून जाणारी पाईपलाईन स्थलांतरीत करण्याचे काम सुरु करण्यात आले असून, त्यानंतर पुलाच्या बांधकामाला गती दिली जाणार आहे.

सदर पुल पूर्ण झाल्यानंतर हजारो नागरिक आणि वाहनचालकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे. तुर्भे स्टोअर पुलाचे काम लवकरात लवकर व्हावे, यासाठी शिवसेना नवी मुंबई उपजिल्हाप्रमुख नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर निविदेत बदल करुन आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.

ठाणे-बेलापूर रोडवरील तुर्भे स्टोअरजवळ या पुलाचे बांधकाम होत असून, पुल पूर्ण झाल्यानंतर सुमारे २५ हजारांहून अधिक नागरिकांना याचा थेट फायदा होणार आहे. तुर्भे एमआयडीसी परिसरात ये-जा करण्यासाठी नागरिकांना अत्यंत वर्दळीचा ठाणे-बेलापूर रस्ता ओलांडावा लागतो. रस्ता ओलांडताना झालेल्या अपघातांमध्ये आतापर्यंत १७ हुन अधिक स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला असून, ४०पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. सदरचा रस्ता ओलांडणे म्हणजे अक्षरशः जीव धोक्यात घालण्यासारखे आहे.

याच पार्श्वभूमीवर सुमारे १५ वर्षांपूर्वी तत्कालीन नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी महापालिका सभागृहात येथे तातडीने पुल उभारण्याची मागणी केली होती. त्यावेळी महापालिकेने २ कोटी रुपये खर्चाचे २ स्कायवॉक उभारण्याचा प्रस्ताव रद्द केला होता. कुलकर्णी यांनी खंत व्यक्त करताना सांगितले की, सदर काम त्याचवेळी झाले असते तर अनेकांचे प्राण वाचले असते.

यानंतर १० वर्षांनी येथे पलायओव्हर उभारण्याची मागणी पुन्हा जोर धरु लागली. यासाठी रस्ता रोको आंदोलन, अधिकाऱ्यांना घेराव घालणे अशा आंदोलनांचाही आधार घेण्यात आला. त्यानंतर वर्कऑर्डर देण्यात आली; मात्र पुलाच्या अंडरपासमधून केवळ रिक्षा आणि कारच जाऊ शकतील, अशा प्रकारचे डिझाईन करण्यात आले होते. त्यामुळे तांत्रिक कारणांमुळे या कामात मोठा विलंब झाला.

अखेर २०२० मध्ये तत्कालीन पालकमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदरचा प्रश्न गांभीर्याने घेत पुलाचे काम लवकर सुरु करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने काम करण्याचे आदेश दिले, त्यानंतर कामाची सुरुवात झाली. मात्र, अधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांना अंधारात ठेवत मनमानी पध्दतीने डिझाईन तयार करुन ते लपवून ठेवले. डिझाईनची माहिती समोर येताच नागरिकांनी तीव्र विरोध केला. परिणामी, डिझाईन बदलून नव्याने निविदा काढण्यात आली आणि आता पुन्हा काम सुरु झाले आहे.

सध्या पुलाखालून जाणारी पाण्याची पाईपलाईन स्थलांतरीत करण्याचे काम सुरू असून, त्यानंतर प्रत्यक्ष पुलाचे बांधकाम हाती घेतले जाणार आहे. सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांनी सांगितले की, स्थानिक नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी सातत्याने मागणी करुन देखील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या कामाला उशीर झाला. सदर काम ८ ते १० वर्षांपूर्वी झाले असते तर अनेकांचे प्राण वाचले असते.

 सकाळी आणि दुपारी शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सदरचा महामार्ग ओलांडावा लागतो. रस्ता पार करताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. पुल झाल्यानंतर हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
-रेणु पांडेय, स्थानिक रहिवासी-शिक्षिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘नमुंमपा'तर्फे उपमुख्यमंत्री अजित् पवार यांना श्रध्दांजली अर्पण