‘सिव्हील हॉस्पिटल'मध्ये वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करा -खा. नरेश म्हस्के

ठाणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नूतनीकरण करण्यात आलेले ९०० खाटांचे ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय पूर्णत्वाच्या टप्प्यात आले आहे. भारतातील सर्वात वेगाने शहरीकरण होणाऱ्या प्रदेशांपैकी एक असलेल्या या भागात आरोग्यसेवेच्या वाढत्या गरजा लक्षात घेता, खासदार नरेश म्हस्के यांनी ११ डिसेंबर रोजी संसदेत शून्य प्रहरात केंद्र सरकारसमोर २ महत्त्वाच्या मागण्या मांडल्या.

सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलद्वारे रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करणे आणि कर्करोग उपचारांसाठी हब-अँड-स्पोक धोरण राबवणे, अशा या २ मागण्या आहेत.

ठाणे सिव्हील हॉस्पिटल ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील मोठ्या लोकसंख्येला सेवा पुरवते. पूर्वीची ३०० खाटांची क्षमता अपुरी पडली होती आणि इमारतीचे काही भाग खराब झाले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नूतनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुधारित पायाभूत सुविधा जवळजवळ तयार झाल्यामुळे, खासदार म्हस्के यांनी भर दिला की, ठाणेला आता प्रगत उपचार सेवांसह वैद्यकीय शिक्षण सुविधांची तातडीने आवश्यकता आहे. केवळ रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांचा विस्तार करणे पुरेसे नाही, लाखो रुग्ण अजूनही विशेष उपचारांसाठी मुंबईला जातात, असे खा. म्हस्के यांनी स्पष्ट केले.

सिव्हील हॉस्पिटल कॉम्प्लेक्समध्ये पीपीपी-आधारित मेडिकल कॉलेज सुरु केल्याने, या प्रदेशाला स्थानिक पातळीवर नवीन डॉक्टरांना प्रशिक्षण देता येईल. मुंबई रुग्णालयांवरील अवलंबित्व कमी करता येईल आणि एकूण आरोग्यसेवा क्षमता वाढवता येईल, असा युवतीवाद खासदार म्हस्के यांनी केला. विकसित केल्या जाणाऱ्या सुपर-स्पेशालिटी सुविधांचा वापर कमी होऊ नये यासाठी सरकारने त्वरित पावले उचलावीत, असे आवाहन त्यांनी केले.

केंद्रीय अर्थसंकल्पात ४,५०० कॅन्सर डे-केअर बेड आणि २०० नवीन जिल्हा कर्करोग केंद्रांच्या घोषणेचे स्वागत करताना म्हस्के म्हणाले की, सदर उपक्रम आर्थिकदृष्ट्या कमकुवत रुग्णांसाठी जीवनरेखा ठरेल. तथापि, त्यांनी जिल्हास्तरीय रुग्णालयांमध्ये कर्करोग तज्ञांच्या तीव्र कमतरतेकडे लक्ष वेधले. सदरची तफावत भरुन काढण्यासाठी, त्यांनी हब-अँड-स्पोक मॉडेल अनिवार्य करण्याची जोरदार शिफारस केली. नवीन जिल्हा केंद्रांना टाटा मेमोरियल हॉस्पिटलसारख्या प्रमुख कर्करोग संस्थांशी जोडण्याची शिफारस केली. अशा प्रणालीमुळे दुर्गम भागातील रुग्णांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि पीपीपी व्यवस्थेद्वारे तज्ञांचा सल्ला घेता येईल. यामुळे वेळेवर आणि उच्च दर्जाचे कर्करोग उपचार सुनिश्चित होतील.

दरम्यान, खा. नरेश म्हस्के यांनी केंद्राला प्रादेशिक आरोग्यसेवा मजबूत करण्यासाठी आणि मुंबईच्या वैद्यकीय व्यवस्थेवरील दबाव कमी करण्यासाठी या उपाययोजनांना प्राधान्य देण्याचीही विनंती केली. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां'चे नाव देण्याची मागणी