मोरबे धरणात मागील वर्षीच्या तुलनेत ३ टक्के कमी जलसाठा

वाशी : नवी मुंबई शहराची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या मोरबे धरणातील जलसाठ्यात यंदा मागील वर्षाच्या तुलनेत घट झाल्याचे समोर आले आहे. सध्या मोरबे धरणात केवळ ४८.०५ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, मोरबे धरणातील जलसाठा १६ ऑगस्ट २०२६ पर्यंत पुरेल, असा अंदाज नवी मुंबई महापालिका कार्यकारी अभियंता संतोष उनवणे यांनी वर्तविला आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्याच्या तोंडावर मोरबे धरणातील पाणीसाठा घटत असला, तरी मागील वर्षाच्या तुलनेत पाण्याची घट अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत धरणातील जलसाठा ५१ टक्के होता. त्यामुळे यंदाची परिस्थिती प्रशासनासाठी चिंतेची ठरत आहे. वाढते तापमान, अपुरा पाऊस आणि वाढती लोकसंख्या यामुळे पाण्याच्या मागणीत वाढ झाली असून, उपलब्ध जलसाठ्यावर ताण निर्माण झाला आहे.त्यात पनवेल परिसरात पाण्याची चोरी होत असल्याचा आरोप होत आहे.

नवी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याचा मोरबे धरणातील ४८.०५ टक्के जलसाठा योग्य नियोजन आणि काटकसरीने वापरल्यास ऑगस्ट पर्यंत नवी मुंबई शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवता येऊ शकतो. मात्र, पावसाळा उशिरा सुरु झाल्यास किंवा अपेक्षित प्रमाणात पर्जन्य न झाल्यास पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून पाणी व्यवस्थापनावर विशेष भर दिला जात आहे. नवी मुंबई शहरातील पाणीगळती रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून, अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तज्ज्ञांच्या मते, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे नियोजन अधिक शाश्वत पध्दतीने करणे अत्यावश्यक बनले आहे. पर्यायी जलस्त्रोतांचा शोध, जलसाठा वाढविण्याच्या योजना आणि पुनर्वापराच्या प्रकल्पांची अंमलबजावणी केल्यास भविष्यातील पाणीटंचाई टाळता येऊ शकते. एकूणच, मोरबे धरणातील घटता जलसाठा नवी मुंबई शहरासाठी इशारा मानला जात असून, महापालिका प्रशासनासोबतच नागरिकांनीही पाणी बचतीसाठी सक्रिय भूमिका घेणे, काळाची गरज असल्याचे अधोरेखित होत आहे.

एकीकडे पनवेल तालुक्यातील देवद आणि विंचुबे ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या मोरबे जलवाहिनीतून दररोज तब्बल १ लाख युनिट पाणी अनधिकृतपणे उपसले जात असल्याचा आरोप नगरसेवक गवस यांच्याकडून करण्यात आला आहे. या ठिकाणी केवळ १८०० युनिटपर्यंत पाणी वापरण्याची अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीला अनधिकृत भगदाड पाडून दररोज १ लाख युनिटपर्यंत पाणी चोरले जात आहे. या प्रचंड पाणीचोरीबाबत नवी मुंबई महापालिका तर्फे खान्देश्वर पोलिसांना पत्र देखील देण्यात आले आहे.

यंदा मान्सून सरासरीच्या केवळ ९४ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.त्यात एल निनोमुळे मान्सूनचे वारे कमकुवत होऊन पावसावर थेट परिणाम होऊन जून महिना तुलनेने स्थिर राहील पण जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांत पाऊस कमी पडण्याची शक्यता ‘स्काय मॅट' या संस्थेने वर्तवली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका रक्तपेढी मध्ये रक्ताची कमतरता; नागरिकांना रक्तदानाचे आवाहन