‘एसटी'च्या ‘राजमाता जिजाऊ' बससेवेचे लोकार्पण

मुंबई : ‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ'च्या तापयात अत्याधुनिक सुविधांनी सज्ज ‘राजमाता जिजाऊ' या बससेवेचा लोकार्पण सोहळा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नवीन बससेवेची २४ मार्चपासून सुरुवात करण्यात आली.
विधानभवन प्रांगणात पार पडलेल्या बससेवा लोकार्पण सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, दोन्ही विधामंडळाचे सदस्य, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, ‘एसटी महामंडळ'चे व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर, अशोक लेलँडचे वरिष्ठ व्यवस्थापक जॉन मॅथ्यू, टाटा मोटर्सचे ग्लोबल हेड सुशांत नाईक, आदि उपस्थित होते.

‘राजमाता जिजाऊ' या नावाने सुरु करण्यात आलेली सदर बससेवा महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची आठवण करुन देणारी असून, राजमाता जिजाबाई यांच्या प्रेरणादायी कार्याला अभिवादन करणारी आहे. ‘हिंदवी स्वराज्य'चे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राजमाता जिजाऊंच्या स्मरणार्थ सदर बससेवा सुरू करण्यात आली आहे. या नवीन उपक्रमांतर्गत सुमारे ३ हजार बसेस राज्यभरात टप्प्याटप्प्याने दाखल होणार असून, प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. ‘एसटी महामंडळ'च्या तापयात यापूर्वी शिवनेरी, शिवशाही, ‘शिवाई, हिरकणी आणि यशवंती अशा विविध सेवांचा समावेश असून, ‘राजमाता जिजाऊ' बस सेवा त्या मालिकेत आणखी एक महत्त्वाची भर असणार आहे. या उपक्रमामुळे राज्यातील सार्वजनिक परिवहन अधिक सक्षम आणि प्रवासी-केंद्रित होण्यास मदत होणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार यांनी बसचे पुजन करुन आणि फीत कापून या सेवेचा शुभारंभ केला. या बससेवेचे लोकार्पण झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांनी बसमधून प्रवास करत बससेवेची सुरुवात केली. यावेळी बसच्या समोर प्रतिकात्मक स्वरुपात घोड्यावर आरुढ झालेल्या राजमाता जिजाऊ यांच्या देखाव्यामुळे सदर लोकार्पण सोहळा ऐतिहासिक आणि प्रेरणादायी ठरला.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबईत ‘महालक्ष्मी सरस'चा डंका