करवाढ नसणारा ‘ठामपा'चा ६२२१ कोटींचा अर्थसंकल्प सादर

‘टीएमटी'चा ७९१ कोटी ८६ लाखांचा अर्थसंकल्पही सादर

ठाणे : कोणतीही करवाढ नसलेला तरीही महसुली उत्पन्न वाढविण्यावर भर, कामांचा दर्जा उत्तम रहावा याकडे विशेष लक्ष देणारा ठाणे महापालिकेचा सन २०२६-२०२७ चा ६२२१ कोटी १२ लक्ष रुपयांचा मूळ अर्थसंकल्प २३ मार्च रोजी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांना विशेष सर्वसाधारण सभेत सादर केला. नागरिकांना चांगेल जीवनमान देता यावे यासाठी महापालिका कटीबध्द असून अर्थसंकल्पाची त्यादृष्टीने मांडणी करण्यात आल्याचे प्रतिपादन आयुक्त सौरभ राव यांनी अर्थसंकल्पीय सभेत केले.

तसेच परिवहन उपक्रमाचा ७९१ कोटी ८६ लक्ष रुपयांचा मूळ अर्थसंकल्प परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्याकडे सादर केला. याप्रसंगी उपमहापौर कृष्णा पाटील, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ पठाण, सर्वपक्षीय गटनेते पवन कदम, माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे, मुकेश मोकाशी, अभिजीत पवार, सरफराज खान उर्फ सैफ पठाण, आदि व्यासपीठावर उपस्थित होते.

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सन २०२५-२६ चा ५६४५  कोटी रवकमेचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला होता. यामध्ये पाणी पुरवठा आकार, शहर विकास विभाग, अग्निशमन या विभागांच्या उत्पन्नात काही प्रमाणात घट येत आहे. त्यामुळे महसुली उत्पन्न ३५२३ कोटी ७९ लक्ष ऐवजी ३४६१ कोटी   सुधारित करण्यात येत आहे. महापालिकेस प्राप्त होणाऱ्या अनुदानाचा विचार करता मूळ अर्थसंकल्पात अपेक्षित केलेल्या ६१२ कोटी ५९ लक्ष अनुदानाऐवजी प्रत्यक्षात डिसेंबर २०२५ अखेर १२६९ कोटी ३१ लक्ष अनुदान प्राप्त झाले असल्याने सुधारित अर्थसंकल्पामध्ये अनुदान आणि सहाय्यक अनुदानापोटी १४९३ कोटी १५ लक्ष अपेक्षित केले आहे.  अमृत २.०० योजनेसाठी ६० कोटी ८९ लक्ष कर्ज अपेक्षित धरण्यात आले होते. परंतु, अमृत २.०० अंतर्गत कर्ज न घेता केंद्र शासनामार्फत बिनव्याजी अर्थसहाय्यापोटी ९८ कोटी ६८ लक्ष प्राप्त झाले आहे.

खर्च बाजुस सन २०२५-२६ मध्ये महसुली खर्च ३७२२ कोटी ९३ लक्ष प्रस्तावित केला होता, तो सुधारित अंदाजपत्रकात ३४४० कोटी ८० लक्ष अपेक्षित असून भांडवली खर्च १९२१ कोटी ४१ लक्ष ऐवजी भांडवली अनुदानात वाढ झाल्याने भांडवली खर्च १९९६ कोटी ३९ लक्ष सुधारित करण्यात आला आहे. तसेच सन २०२६-२७ च्या मूळ अर्थसंकल्पामध्ये महसुली उत्पन्न ४०७८ कोटी अपेक्षित असून अनुदान आणि कर्जासह ६२२१ कोटी १२ लक्ष रवकमेची जमा बाजू ३८१८ कोटी १७ लक्ष महसूली खर्च आणि २४०१ कोटी ५५ लक्ष भांडवली खर्चाचा १ कोटी ४० लक्ष अखेरच्या शिलकेसह ६२२१ कोटी १२ लक्ष रुपयांचा मूळ अर्थसंकल्प असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदमध्ये सांगितले.

या पत्रकार परिषदप्रसंगी अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, मुख्य लेखा-वित्त अधिकारी दिपक शिंदे, ठाणे परिवहन सेवेचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे, आदि व्यासपीठावर उपस्थित होते. त्याचवेळी परिवहन उपक्रमाचे सन २०२६-२७ चे मूळ अंदाजपत्रक ७९१ कोटी ८६ लक्ष महापालिका आयुक्त सौरभ राव यांना परिवहन सेवेचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी सादर केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

भिवंडी महापालिकेचा ११७९ कोटी १० लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर