सानपाडा येथील संशयास्पद इनोव्हा कारचा प्रकार :
नवी मुंबई : पांढऱया रंगाच्या इनोव्हा कारच्या डिक्कीमधून एका व्यक्तीचा हात बाहेर आल्याचा व्हिडीओ सोमवारी सायंकाळी सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, कोपरखैरणेतील चार तरुणांनी लॅपटॉप विक्रीच्या प्रमोशनचा व्हिडिओ रिल्स तयार करण्यासाठी सदर प्रकार केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे पोलिसांसह सर्वांनीच सुटकेचा निश्व:स टाकला आहे. मात्र पोलिसांनी या चार तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर मोटारवाहन कायद्यानुसार कारवाई करुन त्यांची सुटका केली आहे.
सोमवारी 14 एप्रिल रोजी सगळीकडे डॉ.आंबेडकर जयंतीची धामधुम सुरु असताना, वाशी ते सानपाडा रेल्वे स्थानकालगतच्या सर्व्हीस रोडवर डिक्कीमधुन एका व्यक्तीचा हात बाहेर असलेली एक पांढऱया रंगाची इनोव्हा जाताना निदर्शनास आली. सदर प्रकार हा संशयास्पद असल्याचे वाटल्याने काही नागरीकांनी मोबाईलद्वारे त्याचा व्हिडीओ तयार करुन पोलिसांना माहिती दिली. सदरचा व्हिडीओ काही वेळातच व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची एकच धावाधाव सुरु झाली.
सानपाडा पोलिसांनी व गुन्हे शाखेने या कारच्या नंबरवरुन त्याच्या मालकाचा शोध घेतला असता, सदरची कार साकीनाका येथील व्यक्तीची असल्याचे तसेच कोपरखैरणेत राहणाऱया मीनहाज शेख याने त्याची इनोव्हा कार लग्न कार्यासाठी नेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी कोपरखैरणे येथून मीनहाज शेख याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सदर प्रकाराबाबत चौकशी केल्यानंतर त्याचे वाशीतील हावरे फँटासिया बिल्डींगमध्ये लॅपटॉप दुरुस्तीचे व खरेदी विक्रीचे दुकान असल्याचे त्याने सांगितले.
तसेच लॅपटॉप विक्रीच्या प्रमोशनकरीता व्हिडिओ रिल्स बनवताना त्यांनी कारच्या डिक्कीमधुन मृत व्यक्तीचा हात बाहेर आला आहे, हे भासवण्यासाठी त्यांनी सदर प्रकार केल्याचे सांगितले. मात्र सदर तरुणांनी रिल्स बनवण्यासाठी केलेल्या या प्रकारामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरल्याने सानपाडा पोलिसांनी मीनहाज मोहम्मद अमीन शेख (25), शहावार तारीख शेख (24), मोहम्मद अनस अहमद शेख (30) व इंजमाम अख्तर रजा शेख या चौघांना ताब्यात घेतले. त्यांनंतर पोलिसांनी त्यांच्या विरोधात मोटार वाहन अधिनियम कलम 184 अन्वये कारवाई करुन त्यांची सुटका केली.
अजयकुमार लाडंगे (सहाय्यक पोलीस आयुक्त-गुन्हे शाखा नवी मुंबई)
इनोव्हा कारच्या डिक्कीमधुन एका व्यक्तीचा हात बाहेर आलेला प्रकार हा संशयित प्रकार नसून काही तरुणांनी लॅपटॉप विक्रीचे प्रमोशन करण्यासाठी रिल्स बनवताना सदर प्रकार केल्याचे तपासात आढळुन आले आहे. मात्र ज्या प्रकारामुळे जनतेमध्ये भितीचे व घबराटीचे वातावरण पसरेल अशा प्रकारच्या अफवा, रिल्स नागरीकांनी पसरवू नयेत, तसेच डीजीटल माध्यमांच्या आहारी गेलेल्या नवीन पीढीने अशा प्रकारांपासून दुर रहावे.