कर थकबाकीदारांविरोधात महापालिकेची अटकावणी, जप्ती मोहीम

पनवेल : पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कर संकलन-कर आकारणी विभागाच्या वतीने आयुक्त मंगेश चितळे यांच्या आदेशानुसार मालमत्ता कर न भरणाऱ्या थकबाकीदारांविरोधोत अटकावणी आणि जप्ती मोहीम तीव्र करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने मालमत्ता कर न भरणाऱ्या औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांवर आणि मालमत्ता धारकांवर अटकवणीची कारवाई करण्यात येत आहे.

महापालिका क्षेत्रातील औद्योगिक वसाहतीमधील थकीत मालमत्ता कर असणाऱ्या विविध कारखान्यांवर आणि हॉटेल्सवर अटकावणीची आणि जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील विविध नोडमध्ये सुमारे १६७३ अटकावणी वॉरंट नोटीसांचे वाटप केले असून एकूण १३८ मालमत्ता थकबाकीदार मालमत्ता धारकांवर अटकवणीची कठोर कारवाई केल्याने थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.

महापालिका प्रशासन थकबाकीदारांच्या विरोधात कठोर पावले उचलत आहे. उपायुक्त स्वरुप खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली कर अधीक्षक महेश गायकवाड तसेच कर अधीक्षक सुनील भोईर यांच्या नेतृत्वात जप्ती कारवाई आणि वसुली कारवाईसाठी मनुष्यबळ वाढविण्यात आले असून कारवाईला गती देण्यासाठी वसुली पथकामध्ये वाढ करण्यात आली आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात ३ लाख ६९ हजार निवासी, बिगर निवासी, व्यावसायिक, औद्योगिक आदि नोंदणीकृत मालमत्ता आहेत. या मालमत्ता धारकांकडून कर वसुलीसाठी महापालिकेचे विविध झोन (नोड) तयार केले आहेत. महापालिकेच्या एकूण ९ नोड मध्ये मालमत्ता कराची मागणी एकूण २२८८.८६ कोटी इतकी असून त्यापैकी ६८१.०९ कोटी वसुली करण्यात आली आहे. उर्वरित १६०७.७७ कोटी रुपये मालमत्ता कर वसूल करण्यासाठी मालमत्ता कर विभागाकडून धडक कारवाई सुरु आहे.

तंत्रज्ञानाद्वारे टॅक्स भरणे सुलभ...
नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी महापालिकेत न येता ऑनलाईन पध्दतीने भरता यावा यासाठी महापालिकेने ‘झ्श्ण् कर मित्र' ॲप सुरु केले आहे. तसेच  panvelmc.org या वेबसाईटवर जाऊनही आपला मालमत्ता कर नागरिकांना भरता येणार आहे. ‘पनवेल कनेक्ट ॲप'च्या माध्यमातूनही करविषयक तक्रार निवारणाची सोय उपलब्ध आहे.

हेल्पलाईन क्रमांक, चॅटबॉट सुविधा...
पनवेल महापालिकेकडून टॅक्ससाठी हेल्पलाईन क्रमांक १८००२६८९९६९ सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत नागरिकांच्या मदतीसाठी उपलब्ध आहे. तसेच [email protected] असा व्हॉटस्‌ॲप चॅटबॉट देखील नागरिकांना मदतीसाठी उपलब्ध आहे.

सुट्टीच्या दिवशीही कार्यालये सुरु...
३१ मार्च २०२६ मालमत्ता कर भरण्याची शेवटची तारीख असून नागरिकांना मालमत्ता करभरणे सोयीचे व्हावे यासाठी मार्च महिन्यातील सर्व शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी मालमत्ता कर वसुली विभाग, लेखा विभाग, नागरी सुविधा केंद्र, पाणी कर संकलन विभाग, प्रभाग समिती अ, ब, क, ड आणि नावडे उपविभाग सुरु राहणार आहे.

मालमत्ता कर महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्वाच स्त्रोत आहे. महापालिकेची विविध विकास कामे सध्या सुरु असून पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांनी आपला थकीत मालमत्ता कर भरुन महापालिकेस सहाकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
-स्वरुप खारगे, उपायुवत-पनवेल महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

१५ हजारहून अधिक थकबाकीदारांकडून ८१ कोटींचा कर जमा