प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
‘टीओडी मीटर'द्वारे १२.८१ लाख ग्राहकांना ४.१३ कोटींची सवलत
मुंबई : सध्या राज्यामध्ये सर्व ठिकाणी आधुनिक पध्दतीचे स्मार्ट टीओडी मीटर लावण्यात येत आहे. सदर मीटर ग्राहकांना रियल टाईम वीज वापराची माहिती देऊन वीज वापरात पारदर्शकता आणते. विशेष म्हणजे सकाळी ९ वाजल्यापासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वीज वापर करणाऱ्या घरगुती टीओडी मीटर धारकांना ८० पैसे प्रति युनिट सवलत मिळत आहे. ‘महावितरण'च्या भांडुप परिमंडलात सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२५ या तीन महिन्यात १२ लाख ८१ हजार वीज ग्राहकांनी या विशिष्ट वेळेत वीजवापर करुन ४ कोटी १३ लाख रुपयांची सवलत घेतली आहे.
टीओडी मीटर मुळे ग्राहकांना अचूक बिलिंग मिळते आणि रियल टाईममध्ये वीज वापराबाबत माहिती मिळते. ज्यामुळे ग्राहक वीजवापर करण्याचे चोख नियोजन करून वीजबिलात बचत करु शकतात. ‘महावितरण'च्या भांडुप परिमंडलात टीओडी मीटर वापर करुन वीजबिलात सवलत घेणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. सप्टेंबर-२०२५ मध्ये पेण मंडळातील १ लाख ४० हजार ५६५ ग्राहकांनी २६ लाख २० हजार रुपयांची टीओडी सवलत घेतली. ठाणे मंडळात १ लाख २१ हजार ४५१ ग्राहकांनी ५४ लाख ४३ हजार इतकी टीओडी सवलत घेतली, तर वाशी मंडळातील १ लाख ३८ हजार २३९ ग्राहकांनी ५६ लाख ९४ हजार एवडी टीओडी सवलत घेतली. ऑक्टोबर २०२५ मध्ये पेण मंडळातील १ लाख ४० हजार २२६ ग्राहकांनी २२ लाख ३ हजार रुपयांची टीओडी सवलत घेतली. ठाणे मंडळात १ लाख ३५ हजार ८०४ ग्राहकांनी ५० लाख ३८ हजार आणि वाशी मंडळातील १ लाख ५० हजार ८६० ग्राहकांनी ५० लाख ९० हजार एवढी टीओडी सवलत घेतली. त्याचप्रमाणे नोव्हेंबर २०२५ मध्ये पेण मंडळातील १ लाख ४६ हजार ४७१ ग्राहकांनी २५ लाख २७ हजार रुपयांची, ठाणे मंडळात १ लाख ४८ हजार ३९७ ग्राहकांनी ६४ लाख ३ हजार रुपयांची टीओडी सवलत घेतली तर वाशी मंडळातील १ लाख ५९ हजार ०२६ ग्राहकांनी ६३ लाख ५६ हजार रुपये टीओडी सवलत घेतली. सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२५ या तीन महिन्यात १२ लाख ८१ हजार वीज ग्राहकांनी या विशिष्ट वेळेत वीजवापर करुन ४ कोटी १३ लाख रुपयांची सवलत घेतली आहे.
टीओडी मीटरमुळे विजेच्या वापराविषयी अचूक माहिती मिळते. यामुळे विजेच्या बिलांमधील तफावतीबद्दलच्या तक्रारी कमी होण्याची अपेक्षा आहे. ग्राहकांना त्यांच्या मोबाईल ॲपद्वारे वीज वापराचा तपशील समजतो. ग्राहकांना वीज वापरावर नियंत्रण ठेवता येते. या स्मार्ट मीटरमुळे वीजचोरी आणि गैरप्रकार रोखण्यास मदत होते आणि पारदर्शकता वाढते.
-संजय पाटील, मुख्य अभियंता-भांडुप परिमंडल, महावितरण.