प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
गझलनवाज भीमराव पांचाळे यांचा अमृत महोत्सव सत्कार
ठाणे : गझल हा कवितेचाच प्रकार आहे, ते कवितेचे लेकरू आहे, पण गझल हे कवितेवरचे आक्रमण म्हणत गझलची पिछेहाट आम्हीच केली. मी जेव्हा मराठी गझल गायला लागलो तेव्हा मला भीकेचे डोहाळे लागले, अशी टीका माझ्यावर झाली. पण पतियाळा आणि किराणा घराण्याच्या गायकीच्या साथीने गझलमधील आशय आणि शब्दाला न्याय देत तिला साजेशी, पोषक अशी स्वरांची सांगड घालत मी गात राहिलो, माझ्या गायकीला रसिकांची आपुलकीची दाद मिळत राहिली, रसिकांनी आपुलकीने दाद दिली म्हणूनच मी गात राहिलो, आज मी कृतकृत्य, धन्य आणि समृध्द आहे, अशा प्रांजळ भावना ज्येष्ठ गझल गायक भीमराव पांचाळे यांनी आपल्या अमृतमहोत्सवाच्या पूर्वसंध्येला ठाण्यात रसिकांशी संवाद साधतांना व्यक्त केल्या.
आपल्या गायकीने मराठी गझल सातासमुद्रापार पोहोचविणारे गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार सोहळ्यानिमित्त ज्येष्ठ गायक पद्मश्री सुरेश वाडकर व राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते सन्मान गडकरी रंगायतन येथे करण्यात आला. यावेळी त्यांच्या पत्नी गीता भीमराव पांचाळे, कन्या भाग्यश्री, जावई रमाकांत गायकवाड गझलकार व ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, अशोक भगत, म. भा. चव्हाण, अर्चना माळवी, दिलीप पांढरपट्टे, ज्योती बालिगराव, दत्ता बाळसराफ उपस्थित होते. ज्येष्ठ गायक पद्मश्री सुरेश वाडकर याप्रसंगी म्हणाले की भीमराव पांचाळे हे मराठीत गझल गाणारे एकमेव गायक आहेत. त्यांच्या काही रचना मला गायला मिळाल्या, यासाठी मी नशीबवान आहे. त्यांनी दिलेल्या रचनांमध्ये खूप गोड आणि अवघड जागा होत्या, गायक बंगले, जागा घेतात, पण गाण्यातील जागा घेणे हे सगळ्यांनाच जमते असे नाही, त्यांनी वयाचे आणि गझल गायकीचा शतक महोत्सव साजरा करावा, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.