डाईंग, सायझिंग कंपनीमध्ये वाढत्या आगीच्या घटना
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील सरवली एमआयडीसी परिसरात असलेल्या मंगलमूर्ती डाईंग कंपनीला (प्लांट) गेल्या आठवड्यात भीषण आग लागली होती. सदर आग विद्युत सुरक्षेतील निष्काळजीपणामुळे लागल्याचे प्राथमिक तपासणीत आढळून आले आहे. त्यामुळे अशा घटनेची पुनरावृत्ती परिसरातील इतर कंपन्यांमध्ये होऊ नये म्हणून ऊर्जा विभागाने तपासणी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
राज्य शासनाचा ऊर्जा विभाग भिवंडी शहर आणि परिसरातील प्रत्येक कंपनीच्या विद्युत सुरक्षेची तपासणी करेल आणि जर त्यामध्ये कमतरता आढळल्या तर विद्युत सुरक्षा कायद्यांतर्गत कंपन्यांवर कारवाई करणार असल्याची माहिती ऊर्जा विभागाचे ठाणे-२ चे सहाय्यक विद्युत निरीक्षक अरुण जाधव यांनी दिली. निरीक्षक जाधव यांनी सांगितले की, ८ नोव्हेंबर रोजी सकाळी भिवंडी मधील सरवली एमआयडीसी परिसरातील मंगलमूर्ती डाईंग कंपनी (प्लांट) मध्ये आग लागली. या आगीत कंपनीतील मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. कपडा आणि इतर साहित्यासह मालमत्ता जळून खाक झाली. आगीची माहिती मिळाल्यानंतर, विद्युत निरीक्षक राजेश यादव यांच्या सूचनेनुसार निरीक्षक जाधव यांनी कंपनीची पाहणी केली. तेव्हा चौकशीअंती असे आढळून आले की, कंपनीत आग थर्मो पॅकमधील गळतीमुळे लागली होती. तसेच तपासणी दरम्यान कंपनीत विद्युत सुरक्षेबाबत अनेक त्रुटी आढळून आल्या. त्यानंतर कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सुरक्षेच्या निष्काळजीपणाबाबत ३० दिवसांच्या आत या कंपनी व्यवस्थापनाकडून उत्तर मागविण्यात आले आहे.
भिवंडी शहर आणि परिसरातील इतर कंपन्यांमध्ये विद्युत सुरक्षा त्रुटींमुळे आगीच्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी विद्युत विभाग सुरक्षा तपासणीची योजना आखत आहेत. यामध्ये अर्थिंग, वायरिंग, ट्रान्सफॉर्मर आणि आरसीसीबी सारख्या महत्त्वाच्या विद्युत उपकरणांच्या तपासणीचा समाविष्ट करण्यात आला आहे. जर कमतरता आढळून आल्या तर त्या त्वरित दुरुस्त करण्यासाठी संबंधितांना नोटीस बजावली जाईल. जर कंपन्या या कालावधीत त्यांच्या सुरक्षा त्रुटी दूर करण्यात अपयशी ठरल्या तर त्यांच्यावर विभागीय कारवाई केली जाईल, अशी माहिती सहाय्यक विद्युत निरीक्षक अरुण जाधव यांनी दिली.
ऊर्जा विभागाच्या या निर्णयामुळे मालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. भिवंडी शहर आणि आसपासच्या परिसरात २०० हून अधिक चिमणी असलेल्या डाईंग आणि कापड तयार करणारे यंत्रमाग कारखाने, इतर कंपन्या आहेत. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात सूत आणि कापड रंगवणे, प्रक्रिया करणे तसेच इतर साहित्य माल तयार करणाऱ्या सुमारे २०० हुन अधिक कंपन्या कार्यरत आहेत. तर मोठ्या प्रमाणात कॉटन कापडांचे कारखाने आणि कच्च्या धाग्याचे सायझिंग कारखाने आणि कापडावर प्रक्रिया करणाऱ्या डाईंग कार्यरत आहेत. बहुतेक ठिकाणी पुरेशा अग्निशमन यंत्रणेचा अभाव असून त्याठिकाणी सुरक्षिततेच्या मानकांचे पालन केले जात नाही. त्यांच्या निष्काळजीपणामुळे शहरातील औद्योगिक क्षेत्रात नेहमी आगीच्या घटना घडत राहतात. बहुतेक आगीच्या घटना शॉर्टसर्कटिमुळे आणि कंपनी मालकांच्या सुरक्षेच्या दुर्लक्षामुळे घडल्याचे तपासणी आणि चौकशीत आढळून आल्याची माहिती जाधव यांनी दिली.
विद्युत व्यवस्था आणि सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्यामुळे आगीच्या घटना वाढत आहेत. त्यांनी सर्व कंपन्यांना विद्युत सुरक्षेबाबत विशेष काळजी घेण्याचे आवाहन ऊर्जा विभागातील अधिकाऱ्यांनी केले असून विद्युत सुरक्षा तपासणीनंतर, आगीच्या घटनांना काही प्रमाणात आळा बसेल. कंपनी आणि इतर औद्योगिक क्षेत्रात विद्युत सुरक्षा व्यवस्था देखील चांगली ठेवणे आवश्यक आहे, असे मत सहाय्यक विद्युत निरीक्षक अरुण जाधव यांनी व्यक्त केले आहे.