१४ गावांना सर्व सुविधा पुरवा
कल्याण : ‘सर्वपक्षीय विकास समिती'च्या कार्याला मोठं यश प्राप्त झाले असून नवी मुंबई महापालिकामध्ये समाविष्ठ झालेल्या १४ गावांना पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सुविधा, शाळेच्या कामांना तातडीने प्राधान्य आदि सर्व सुविधा देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, प्रधान सचिव, ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, आदिंसह ‘समिती'चे सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
१४ गावांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सतत झटणाऱ्या ‘सर्वपक्षीय विकास समिती'ने नवी मुंबई महापालिकेची मागणी केली. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जीआर पारित केला. त्यानंतर काही निधी संदर्भात अडचणी आली असता पुन्हा ‘समिती'ने पत्रव्यवहार करुन नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री यांच्याकडे निधीची मागणी करीतत्याचा पाठपुरावा करत होती. निधीचा पाठपुरावा करत असताना खा. डॉ. श्रीकांत शिंदे आणि आ. राजेश मोरे यांनी देखील १४ गावांच्या विकासासाठी कंबर कसली आणि त्यांनी देखील ना. एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बैठक घेण्याकरिता प्रयत्न केले. सदर पाठपुराव्याला यश म्हणून ‘समिती'ला पत्र पाठवून नगरविकास खात्याकडून सह्याद्री अतिथीगृह येथे बैठकीचे आयोजन केले.
सदर बैठकीत १४ गावांच्या विकासासंदर्भात महापालिकेच्या वतीने रस्ते, गटर, लाईट, पाणी, आरोग्य यासंदर्भात लवकरात लवकर सुविधा चालू करण्याच्या आदेश नामदार शिंदे यांनी महापालिका आयुवत डॉ. शिंदे यांना दिले. यावर या सर्व कामांचे टेंडर देखील तयार केल्याचे आयुक्त शिंदे यांनी सांगितले. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील तात्काळ महापालिकेला ७० कोटी रुपये वर्ग करण्याचे आदेश सचिवांना दिले.