प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
‘अंबरनाथ'मध्ये ‘भाजपा-काँग्रेस'ची ‘युती'
अंबरनाथ : ‘भाजपा'ने ‘अंबरनाथ नगरपरिषद'मध्ये ‘काँग्रेस'सोबत केलेली युती अत्यंत ‘अभद्र' असून, या स्वार्थी राजकारणाविरोधात शिवसेना आता खंबीरपणे विरोधी पक्षाची भूमिका बजावेल, अशी घोषणा शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी केली. ६ जानेवारी रोजी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषद मध्ये किणीकर बोलत होते. यावेळी त्यांनी ‘भाजपा'च्या दुटप्पी धोरणावर कडक शब्दात ताशेरे ओढले.
डॉ. किणीकर म्हणाले, एकीकडे देशपातळीवर ‘काँग्रेसमुक्त भारत'चा नारा देणारा भाजप सत्तेसाठी त्याच ‘काँग्रेस'शी हातमिळवणी करत आहे. ‘काँग्रेस'ची हिंदुविरोधी विचारसरणी आणि ‘भाजपा'ची विचारधारा यात जमीन-अस्मानाचा फरक असतानाही केवळ सत्तेच्या हव्यासापोटी सदर दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. ‘अंबरनाथ नगरपरिषद'मध्ये ‘शिवसेना'चे सर्वाधिक २७ नगरसेवक निवडून आले असतानाही, ‘भाजपा'ने लोकभावनेचा आदर न करता अनैसर्गिक युतीचा मार्ग स्वीकारला आहे.
शहराच्या हितासाठी होणाऱ्या विकासकामांना आमचा पूर्ण पाठिंबा असेल. मात्र, जिथे कुठे चुकीची कामे किंवा भ्रष्टाचार होईल, तिथे शिवसेना चोख प्रत्युत्तर देईल, असा इशाराहीडॉ. किणीकर यांनी दिला. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद-नगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली होती. परंतु, आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ‘भाजपा'ने घेतलेला सदर निर्णय त्यांना महागात पडेल, असेही डॉ. किणीकर यांनी नमूद केले.
या पत्रकार परिषदेत माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, नगरसेवक अब्दुल शेख, स्वप्नील बागुल, विकास सोमेश्वर, माजी नगरसेवक सुभाष साळुंखे उपस्थित होते. ‘अंबरनाथ नगरपरिषद'च्या ५९ जागांपैकी ‘शिवसेना'कडे २७, ‘भाजपा'कडे १४, ‘काँग्रेस'कडे १२ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडे ४, २ अपक्ष असे जागांचे बलाबल आहे. थेट नगराध्यक्षपदी ‘भाजपा'च्या तेजश्री करंजुले निवडून आल्या असल्या तरी, सत्तास्थापनेसाठी ‘भाजपा'ने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने जुळवाजुळव केल्याने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ‘युती'साठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न होऊनही चर्चा फिस्कटल्याने अखेर ‘शिवसेना'ने सदर निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.