प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
गॅस दरवाढी विरोधात ‘काँग्रेस'चे आंदोलन
पनवेल : राज्य शासनाने केलेल्या गॅस दरवाढी विरोधात पनवेलमध्ये ‘काँग्रेस'तर्फे पायी मोर्चा काढण्यात आला. यावेळी सिलेंडरची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून केंद्र आणि राज्य शासनाचा निषेध करण्यात आला.
‘पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटी'चे अध्यक्ष सुदाम पाटील यांच्या नेतृत्वाखाली १२ मार्च रोजी सदर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष हेमराज म्हात्रे, महिला आघाडी प्रभारी चंद्रकला नायडू, नगरसेवक हरेश केणी, लतीफ शेख, लीला कातकरी, डॉ. अमित दवे, अमित लोखंडे, राकेश जाधव, सुरेश पाटील, सुधीर मोरे यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी मोदी सरकार विरोधात घोषणा दिल्या. तसेच गॅसची दरवाढ रद्द करण्याची आग्रही मागणी केली.
मोर्चा प्रांत कार्यालयापर्यंत नेण्यात आला. यावेळी निवेदन देताना सुदाम पाटील यांनी सांगिलते की, शासनाने गॅसची दरवाढ केली आहे. सदर दरवाढ सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी आहे. तसेच गॅस सिलेंडरची कृत्रिम टंचाई दाखवून ३ ते ४ हजार रुपयांमध्ये सिलेंडर ब्लॅकने विकले जात आहेत. यासाठी शासनाने भरारी पथक नेमून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी पाटील यांनी केली. तर नगरसेवक हरेश केणी यांनी सुध्दा मोदी सरकारचा निषेध करुन गॅस टंचाईमुळे अनेक हॉटेल बंद पडली आहेत. यातून महागाई वाढणार असून कित्येकांच्या उद्योगधंद्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घालावे, अशी मागणी केणी यांनी केली आहे.