ऑर्डनन्स फॅक्टरीत २० कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडली

अंबरनाथ :अंबरनाथ येथील ऑर्डनन्स फॅक्टरीतील एमटीपीएफ कारखान्यात दुषित पाणी प्यायल्यामुळे २० कर्मचाऱ्यांची प्रकृती अचानक बिघडली. उलट्या आणि मळमळ असा त्रास सुरु झाल्यावर त्यांना तातडीने ऑर्डनन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

१९ सप्टेंबर रोजी सकाळी नाश्ता केल्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी कारखान्यातील कुलरमधून पाणी प्यायले होते. त्यानंतर थोड्याच वेळात गोकुळ धोंडू ठाकूर, चेतन दशरथ थरता, नागेंद्र हनुमंत शिंदे यांच्यासह एकूण २० कर्मचाऱ्यांना अस्वस्थ वाटू लागले. सुरुवातीला काही जणांनाच त्रास झाला. मात्र, नंतर इतरांनाही अशीच लक्षणे दिसू लागल्याने त्यांना तातडीने कारखान्याच्या दवाखान्यात नेण्यात आले. लक्षणे गंभीर वाटल्याने सर्वांना ऑर्डनन्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. सध्या सर्व कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सदर घटनेची चौकशी केली असता, ज्या कुलरमधून पाणी प्यायले गेले त्याच्या फिल्टरमध्ये मोठ्या प्रमाणात माती साचल्याचे आढळून आले. तसेच कुलरची वेळेवर देखभाल आणि स्वच्छता केली जात नसल्याचेही समोर आले आहे. या गंभीर निष्काळजीपणामुळेच सदरची घटना घडल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला असून, प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सकाळ सिटी हेल्थ रन मॅरेथॉननिमित्त पामबिच मार्गावरील वाहतुकीत बदल