ठाणे जिल्ह्यासाठी १७०० कोटींच्या आराखड्यास वाढीव निधी -मुख्यमंत्री

ठाणे : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२६-२७ अंतर्गत ठाणे जिल्ह्याच्या बळकटीकरणासाठी तयार करण्यात आलेल्या १७०० कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मागणीपेक्षा वाढीव निधी देण्यात येईल. ठाणे जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री (वित्त-नियोजन) देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) प्रारुप आराखड्यांना अंतिम स्वरुप देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडली. यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस उपमुख्यमंत्री तथा ‘ठाणे'चे पालकमंत्री एकनाथ शिंदे, ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तसेच ‘मिरा-भाईंदर'चे आमदार नरेंद्र मेहता, ‘कल्याण पूर्व'च्या आमदार सुलभा गायकवाड, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात उपस्थित होते.

१२ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा वार्षिक योजना बैठकीत सन २०२६-२७ साठीचा १७०० कोटी रुपयांचा प्रारुप आराखडा मंजूर करण्यात आला होता. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सदर आराखडा राज्यस्तरीय बैठकीत सादर केला.

‘जिल्हा नियोजन समिती'ने तयार केलेल्या या आराखड्यात ६६०.३५ कोटी रुपयांचा मूळ प्रस्ताव समाविष्ट होता. विविध विभाग आणि यंत्रणांच्या मागण्यांचे विश्लेषण करुन व्यवहार्य ठरणारी १०३९.६५ कोटींची अतिरिक्त मागणी प्रस्तावित करण्यात आली. अशा प्रकारे एकूण १७०० कोटींचा आराखडा राज्य शासनाकडे सादर करण्यात आला.

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी सुरुवातीला ठाणे जिल्ह्यास ८०५.८४ कोटी रुपयांची तरतूद कळविण्यात आली होती. त्यानंतर राज्यस्तरीय बैठकीत १९९.१६ कोटींची वाढ देण्यात आली. परिणामी, ठाणे जिल्ह्यासाठी १००५ कोटी रुपयांचा अंतिम नियतव्यय मंजूर करण्यात आला. सन २०२४-२५ च्या तुलनेत सदर वाढ सुमारे ६७ टक्के होती.

सन २०२५-२६ या वर्षात विविध नाविन्यपूर्ण योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. ठाणे येथील तालुका क्रीडा संकुलात ९९.९८ लाख रुपये खर्चुन जिम्नॅस्टिक खेळासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उभारण्यात येत आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात नागरिक आणि पर्यटकांच्या सोयीसाठी २९८.९६ लाख रुपये खर्चुन सेल्फ-क्लिनिंग इलेक्ट्रॉनिक ईको-टॉयलेटस्‌ उभारण्यात येत आहेत.

शहापूर तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात १२५ लाख रुपये खर्चुन १० खाटांचे आधुनिक ‘न्यूट्रिशन रिहॅबिलिटेशन सेंटर' (एनआरसी) सुरु करण्यात येत आहे. मुरबाड तालुक्यातील नागरिकांना शासकीय सेवा सुलभपणे उपलब्ध व्हावी, यासाठी १३८.१७ लाख खचर्ुन आधुनिक सेतू सुविधा केंद्र उभारण्यात येत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये १०० लाख खर्चुन सौरऊर्जेवर चालणारे दिवे बसविण्यात येत आहेत.

‘मिशन भरारी' या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील इयत्ता ५ वी ते ८ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांना तसेच देशातील नामांकित वैज्ञानिक संस्थांना शैक्षणिक भेटींचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी ५०० लाखांचा निधी प्रस्तावित आहे. तसेच भूमाता वनधन केंद्र येथे पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना जंगल, जैवविविधता आणि आदिवासींचा सांस्कृतिक वारसा अनुभवता यावा यासाठी ६५.५० लाख रुपये खर्चुन ‘निसर्ग संवाद संस्कृती संग्रहालय' उभारण्यात येणार आहे. वर्तकनगर, ठाणे येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी ग्रंथालयात १५९.९२ लाख खर्चून आधुनिक बैठक व्यवस्था आणि तंत्रज्ञानाधारित ई-ग्रंथालय सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.

ठाणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबध्द आहे. जिल्ह्याच्या बळकटीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.
- ना. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री-महाराष्ट्र. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अवजड वाहनांच्या वाहतूक नियंत्रणासाठी हाईट बॅरियर्स बसवा