श्री सदस्यांसह ७ हजार नागरिकांकडून महामार्गावर महास्वच्छता
नवी मुंबई : ‘स्वच्छ भारत मिशन'च्या वतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता हीच सेवा' अभियान राबविण्यात येत असून नवी मुंबई महापालिकेच्या वतीने या कालावधीत प्रत्येक दिवशी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने स्वच्छता विषयक मोठा उपक्रम २८ सप्टेंबर रोजी सायन-पनवेल महामार्ग आणि ठाणे-बेलापूर मार्ग या शहरातील २ महत्वाच्या मुख्य मार्गांवर सखोल महास्वच्छता मोहिमेच्या स्वरूपात राबविण्यात आला. मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस पडत असूनही या सखोल महास्वच्छता मोहिमेत ७ हजाराहून अधिक स्वच्छताप्रेमी नागरिक, महापालिका अधिकारी, कर्मचारी, स्वच्छताकर्मी यांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होत शहर स्वच्छतेविषयीची आपली बांधिलकी दाखवून दिली.
विशेष म्हणजे या सखोल महास्वच्छता मोहिमेत डॉ. श्री. नानासाहेब धम्रााधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा, अलिबाग यांचे ५ हजारहून अधिक श्रीसदस्य सहभागी झाले होते. अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्यासह उरण फाटा येथे घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त डॉ. अजय गडदे, बेलापूर विभागाचे सहा.आयुक्त डॉ.अमोल पालवे तसेच श्रीसदस्य आणि नागरिकांनी स्वच्छतेची सामुहिक शपथ ग्रहण केली. यानंतर मोहिमेस सकाळी ७ वाजता सुरुवात झाली.
नवी मुंबई दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचे शहर असून सायन-पनवेल महामार्ग अत्यंत महत्वाचा आणि वर्दळीचा रस्ता शहरातून जातो. या महामार्गाचे सर्वाधिकार ‘पीडब्ल्यूडी'कडे असले तरी या रस्त्यावरील स्वच्छतेचा दृश्य परिणाम नवी मुंबईच्या स्वच्छ शहर नावलौकिकावर होतोे. त्यामुळे सायन-पनवेल महामार्गाच्या स्वच्छतेकडे महापालिकेच्या वतीने विशेष लक्ष देण्यात आले. या स्वच्छता महामोहिमेसाठी ‘डॉ. श्री. नानासाहेब धम्रााधिकारी प्रतिष्ठान'चे श्रीसदस्य यांना महामार्गावरील क्षेत्र वाटप करुन देण्यात आले होते. वाशी, तुर्भे, सानपाडा, जुईनगर, नेरूळ, बेलापूर या विभागांच्या हद्दीत येणाऱ्या सायन-पनवेल महामार्गाच्या तसेच तुर्भे ते दिघा या ठाणे-बेलापूर मार्गाच्या स्वच्छतेसाठी ठराविक अंतराचे क्षेत्र श्रीसदस्यांच्या गटांना वाटप करण्यात आले होते. श्रीसदस्यांसोबत त्या त्या विभागांच्या हद्दीतील नागरिक, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी आणि सदस्य, ‘एनएसएस'चे विद्यार्थी महापालिका अधिकारी-कर्मचारी, स्वच्छतामित्र यांच्यासह उत्स्फुर्तपणे आपापल्या विभागात सहभागी झाले. महामार्गाची स्वच्छता करताना रस्त्यांच्या आणि पदपथांच्या कडेला पावसामुळे वाढलेले गवत आणि वाढलेली रानटी झाडांची रोपे काढून टाकण्यात आली. त्याप्रमाणे वॉटर एन्ट्रीजमध्ये जमा होऊन घट्ट झालेली माती साफ करुन रस्त्यावरील पाण्याच्या प्रवाहाचे मोठ्या गटारात जाणारे मार्ग मोकळे करुन देण्यात आले. याशिवाय प्लास्टिक बॉटल्स, काचेच्या तुटलेल्या बॉटल्स, प्लास्टिक पिशव्या, चॉकलेट व खाद्यपदार्थांचे रॅपर्स, विविध खाद्य साहित्यावरील वेष्टने, कागदाचे आणिकापडाचे तुकडे असा विविध प्रकारचा कचरा संकलित करण्यात आला.
मोठ्या प्रमाणात पडणा-या भर पावसाची पर्वा न करता शहरातील मुख्य मार्ग दुतर्फा स्वच्छ करण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने लोक छत्र्या घेऊन, रेनकोट घालून रस्त्यावर उतरल्याने नवी मुंबईत स्वच्छतेची मोठी चळवळ उभी राहिल्याचे चित्र अनुभवयाला मिळाले.