प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
महासभेत ऐतिहासिक ठराव मंजूर
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण क्षेत्रात मोठा बदल घडवणारा ऐतिहासिक निर्णय २३ मार्च रोजी पार पडलेल्या महासभेत घेण्यात आला. शहरातील सर्व महापालिका शाळा इंग्रजी माध्यमाच्या करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला असून महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनविणे आणि त्यांच्या शैक्षणिक संधींमध्ये वाढ करणे, असा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे सभागृह नेते सागर नाईक यांनी सांगितले.
या निर्णयाची अंमलबजावणी एकाच वेळी न करता टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. सुरुवातीला नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमाची अंमलबजावणी करण्यात येईल, तर आधीपासून शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण बिघडू नये यासाठी त्यांना त्यांच्या सध्याच्या माध्यमातच पुढील शिक्षण पूर्ण करण्याची संधी दिली जाणार आहे. यासोबतच, शाळांमध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देणे, शिक्षकांना इंग्रजी माध्यमासाठी प्रशिक्षण देणे आणि दर्जेदार शिक्षणासाठी आधुनिक पायाभूत सुविधा उभारणे यावरही विशेष भर दिला जाणार असल्याचे सागर नाईक यांनी सांगितले.
गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी सदर निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे महापालिका शाळांची गुणवत्ता वाढेल आणि विद्यार्थ्यांना भविष्यात अधिक संधी उपलब्ध होतील, असे सागर नाईक यांनी सभागृहात स्पष्ट केले. या निर्णयामुळे नवी मुंबईतील हजारो विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार असून, त्यांना खासगी इंग्रजी शाळांप्रमाणे दर्जेदार शिक्षण महापालिकेच्या शाळांमध्येच मिळणार आहे.
या निर्णयामुळे खासगी इंग्रजी शाळांकडे होणारी विद्यार्थ्यांची ओढ काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन कसे केले जाणार? याबाबत काही शिक्षणतज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. एकूणच नवी मुंबई महापालिका सभागृहाचा निर्णय शहराच्या शैक्षणिक धोरणात मोठा बदल घडवणारा ठरणार असून, येत्या काळात त्याचे परिणाम पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.