प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
चक्रीवादळ, आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज
अलिबाग : कोणत्याही नैसर्गिक किंवा तांत्रिक आपत्तीचा सामना करण्यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) किती सज्ज आहे, याचे मूल्यमापन करण्यासाठी दोन दिवसीय भव्य ‘बहु-संस्थात्मक आपत्ती सज्जता सराव' नुकताच यशस्वीरित्या पार पडला. ‘राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण' (NDMA) आणि ‘जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण' (DDMA) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सरावात केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध यंत्रणांनी आपला सहभाग नोंदवून आपत्कालीन सज्जतेचे दर्शन घडविले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात आयोजित या दोन दिवसीय कार्यक्रमाची सुरुवात ‘टेबलटॉप सराव' या सत्राने झाली. या सत्रामध्ये आपत्तीच्या वेळी करावयाचे नियोजन आणि विविध विभागांमधील समन्वयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यानंतर बचाव कार्यासाठी उपयुक्त ठरणारी अत्याधुनिक साधने आणि विशेष वाहनांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. या सरावाचा मुख्य भाग म्हणजे ‘पूर्ण-स्तरीय प्रात्यक्षिक सराव' होता. या माध्यमातून प्रत्यक्ष घटनेच्या वेळी दिला जाणारा प्रतिसाद, लोकांचे सुरक्षित स्थलांतर, शोध आणि बचाव कार्य, धोक्यांचे व्यवस्थापन आणि आपत्कालीन कृती केंद्रांचे कार्यान्वयन या बाबींचे प्रत्यक्ष मैदानावर सूक्ष्म मूल्यमापन करण्यात आले.
या सरावासाठी एक अत्यंत गुंतागुंतीची आणि ‘मल्टी-हॅजार्ड' परिस्थिती निर्माण करण्यात आली होती. यामध्ये ‘चक्रीवादळ, आगीच्या घटना आणि धोकादायक किरणोत्सर्गी पदार्थांची गळती' या आव्हानांचा समावेश होता. या कठीण परिस्थितीत धोक्यांचे नियंत्रण करणे, आगीपासून बचाव करणे, बहुमजली इमारतींमधून नागरिकांचे स्थलांतर करणे, संवाद यंत्रणेची कार्यक्षमता तपासणे, संसाधनांची जुळवाजुळव आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील सुरक्षा सुनिश्चित करणे, यांसारख्या कार्यपध्दतींची कठोर चाचणी घेण्यात आली.
दोन दिवस चाललेल्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाच्या दुसऱ्या दिवशी डॉ.दिनेशकुमार अस्वाल आणि मेजर जनरल अजय वर्मा यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या मोहिमेत केंद्र आणि राज्य शासनाचे विविध विभाग, ‘राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल', सशस्त्र दले, ‘केंद्रीय राखीव पोलीस दल', जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि अणुऊर्जा विभाग यांतील अधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. या सराव सत्रात नवी मुंबई महापालिका, पनवेल महापालिका, सिडको आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, अग्निशमन दल, नागरी संरक्षण दल, आपदा मित्र, आरोग्य विभाग, प्रसारमाध्यमे यांसारख्या स्थानिक आणि तांत्रिक संस्थांनीही मोलाची भूमिका बजावली.
या सरावादरम्यान तातडीचे वैद्यकीय सहाय्य पुरविण्यासाठी कळंबोली येथील व्हाईट लोटस हॉस्पिटल, वाशी येथील फोर्टिस हॉस्पिटल आणि सीबीडी-बेलापूर येथील अपोलो हॉस्पिटल यांची पथके तैनात होती. या व्यापक सरावामुळे विविध संस्थांमधील परस्पर समन्वय अधिक दृढ होण्यास मदत झाली असून, यंत्रणेतील संभाव्य त्रुटी शोधणे शक्य झाले आहे. तीव्र हवामान आणि एकापाठोपाठ उद्भवणाऱ्या विविध धोक्यांमुळे निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीच्या आपत्कालीन परिस्थितींना अधिक प्रभावीपणे प्रतिसाद देण्यासाठी विमानतळाची सज्जता वाढविणे, या सरावाचा मुख्य उद्देश होता.
या यशस्वी कार्यक्रमात रायगड जिल्हाधिकारी किशन जवळे, ‘एनडीएमए'चे सदस्य डॉ. दिनेशकुमार अस्वाल, मेजर जनरल अजय वर्मा, मुख्य सल्लागार (CDRN) डॉ. विनोद कौशिक, अणुऊर्जा विभागाचे सदस्य सचिव (संकट व्यवस्थापन) सरस सेठ, कोकण विभागीय माहिती प्र.उपसंचालक मनोज सानप, पनवेल उपविभागीय अधिकारी पवन चांडक, तहसिलदार श्रीमती भामरे, पनवेल महापालिका मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.आनंद गोसावी, ‘सीआरपीएफ'चे समादेशक अमर सिंग, ‘एनडीआरएफ'चे दुसरे समादेशक दीपक तिवारी, स्फोटक नियंत्रक अमित कुमार, ‘सीआयएसएफ'चे सहाय्यक समादेशक संजय तसेच मंत्रालयातील कक्ष अधिकारी योगिता गवथे आणि प्रकल्प अधिकारी श्रीदत्त कामत, रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक आदी मान्यवरांचा समावेश होता.
या आपत्ती सज्जता सरावाच्या यशस्वी सांगतेमुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रतिसाद कार्यपध्दती आणि कार्यात्मक सज्जता अधिक प्रबळ झाल्याचे दिसून आले आहे.