प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
नवी मुंबई महापौर चषक ४० प्लस क्रिकेट स्पर्धेत दिवागांव इलेव्हन, युनायटेड संघ विजेते
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या वतीने खेळविण्यात आलेल्या ‘नवी मुंबई महापौर चषक ४० प्लस क्रिकेट स्पर्धा'मध्ये ग्रामीण भागातून दिवागांव इलेव्हन तर शहरी भागातून युनायटेड ऐरोली संघ विजेतेपदाचे मानकरी ठरले. सदर स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ‘नवी मुंबई'च्या महापौर सुजाता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
नवी मुंबई महापालिका मुख्यालय जवळील क्रीडांगणात २३, २४ आणि २५ मार्च या तीन दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या नवी मुंबई महापौर चषक ४० प्लस क्रिकेट स्पर्धेची उपान्त्य आणि अंतिम फेरी महापालिकेच्या सीबीडी, सेक्टर-३ येथील राजीव गांधी क्रीडासंकुलात खेळविण्यात आली. विशेष म्हणजे क्रीडा संकुलामध्ये नुकतेच प्रखर पलडलाईटस् लावण्यात आले असल्याने अंतिम फेरीतील सामने प्रकाशझोतात खेळविण्यात आले.
ग्रामीण भागातील ३३ क्रिकेट संघांमध्ये झालेल्या स्पर्धेत दिवागांव इलेव्हन संघाने बेलापूरगांव इलेव्हन संघावर मात करीत विजेतेपदाचा चषक पटकाविला. कोपरीगांव इलेव्हन आणि बोनकोडेगांव इलेव्हन यांना तृतीय क्रमांकाचा चषक प्रदान करण्यात आला. दिवागांव इलेव्हन संघातील किशोर पाटील यांना स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल मालिकावीर चषक प्रदान करण्यात आला. कोपरीगाव इलेव्हनचे योगेश भोईर सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून, बेलापूरगांव इलेव्हनचे उत्तम (ज्यु.) सर्वोत्कृष्ट गोलंदाज तर बोनकोडे इलेव्हनचे योगेश तांडेल सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून मानकरी ठरले.
शहरी भागातील स्पर्धेत २५ संघ सहभागी झाले होते. त्यामध्ये युनाईटेड ऐरोली संघ विजेतेपदाचा तसेच रायझिंग स्टार ऐरोली संघ उपविजेतेपदाचा मानकरी ठरला. खारीगांव इलेव्हन संघाने तृतीय क्रमांक संपादन केला. युनायटेड स्पोर्टस् ऐरोली संघातील खेळाडू जावेद शेख यांना मालिकावीर चषक देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे त्यांच्या संघातील खेळाडुंनी वर्गणी काढून त्यांना उत्तम कामगिराबद्दल रोख पारितोषिक देऊन सन्मानित केले. त्याचप्रमाणे खारीगांव इलेव्हन संघाचे श्रीनिवास उत्कृष्ट फलंदाज, रायझिंग स्टार ऐरोली संघाचे सुनिल केणी उत्कृष्ट गोलंदाज आणि युनायटेड स्पोर्टस् ऐरोलीचे निलेश सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक पदाचे मानकरी ठरले. विजेत्या संघांना मोठ्या आकारातील आकर्षक चषकाप्रमाणेच संघातील प्रत्येक खेळाडुस वैयक्तिक स्मृतिचिन्हे देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी क्रीडा, सांस्कृतिक कार्य-युवक कल्याण समिती सभापती गिरीश म्हात्रे, आरोग्य समिती सभापती डॉ.जयाजी नाथ, नगरसेवक सुरज पाटील, क्रीडा-सांस्कृतिक विभागाच्या उपायुक्त अभिलाषा म्हात्रे, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, कार्यकारी अभियंता (विद्युत) प्रवीण गाडे, ‘४० प्लस मास्टर्स क्रिकेट असोसिएशन'चे अध्यक्ष मास्टर प्रदीप पाटील, उपाध्यक्ष नरेश गौरी, सचिव एल. डी. पाटील, सहसचिव विकास मोकल, खजिनदार मनोज म्हात्रे, भालचंद्र दळवी, माजी नगरसेवक जी. एस. पाटील, सिताराम मढवी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.