प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
बोरीवली गावात ईडी, आयकर विभाग, एटीएसची संयुक्त छापेमारी
भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्गावरील भिवंडी तालुक्यातील पडघा जवळील बोरीवली गावात ईडी, आयकर विभाग आणि एटीएस यांनी ११ डिसेंबर रोजी पहाटे पासून संयुक्त छापेमारी सुरु केली. दहशतवादी कृत्यांशी संबंधित आर्थिक व्यवहारांच्या तपासाच्या अनुषंगाने गावातील अनेक निवासी घरांवर सदर कारवाई होत आहे. सदर कारवाई सुरू असताना गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गावाबाहेरील मैदानात या कारवाईमध्ये सहभागी २० हून अधिक कारचा ताफा उभा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीतील पडघा, पुणे, मालेगाव यासह महाराष्ट्रातील सुमारे ४० ठिकाणी सर्च ऑपरेशन मोहीम राबवली जात आहे. (आयएसआयएस) टेरर मॉड्युलशी संबंधित संशयित आर्थिक हालचालींच्या तपासात सदर कारवाई केली जात असल्याची माहिती समोर येत आहे. ‘एनआयए'ने दाखल केलेल्या प्रकरणाच्या आधारे ‘ईडी'ने अलीकडेच (इसीआयआर) नोंदवला असून, सदर तपास साकिब नाचन प्रकरणाशी जोडला गेला आहे. २८ जून रोजी कारागृहात मृत्यू झालेल्या साकिब नाचनच्या दफनविधीनंतर ‘एटीएस'ची सदर पहिली मोठी कारवाई मानली जात आहे.
‘एटीएस'सह ईडी आणि ‘आयकर विभाग'ने संयुक्त ऑपरेशनल ग्रिड तयार करुन मिळालेल्या माहितीच्या आधारे तातडीने कारवाई केली आहे. या कारवाईमुळे बोरिवली गाव पुन्हा एकदा चर्चेत आला असून संपूर्ण गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. तसेच पुढील तपास सुरू आहे.