पतीला प्रियकराच्या मदतीने खाडीमध्ये फेकले

रबाळे एमआयडीसीतील धक्कादायक घटना

नवी मुंबई : दारुड्या पतीपासून कायमची सुटका करुन घेण्यासाठी विवाहितेने आपल्या प्रियकाराच्या मदतीने पतीला भरपूर दारु पाजून त्याला मद्यधुंद अवस्थेत ठाण्यातील बाळकुम येथील खाडीमध्ये टाकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे आपल्यावर संशय येऊ नये यासाठी विवाहितेने पोलीस ठाण्यात जाऊन पती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांनी संशयावरुन तिचीच उलटतपासणी केल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला. दरम्यान, अद्याप बेपत्ता पतीचा शोध न लागल्याने पोलिसांनी आरोपी विवाहितेला आणि तिच्या प्रियकराला अपहरणाच्या गुन्ह्यात अटक केली आहे.  

सदर घटनेतील आरोपी पुनम कालीदास वाघमारे (२८) रबालेे एमआयडीसीतील आंबेडकरनगरमध्ये पती कालिदास वाघमारे (३०) आणि २ मुलांसह राहत आहे. कालिदास दारु पिऊन आल्यानंतर दरदिवशी पुनमला मारझोड करत होता. पतीकडून होत असलेल्या या त्रासाची माहिती तिने तिचा मित्र सुरेश हरिप्रसाद यादव (२४) याला दिली होती. त्यामुळे सुरेश यादव पुनमला मारहाण करणाऱ्या कालिदास वाघमारे याला शिवीगाळ करुन त्याला मारहाण करत होता. त्यामुळे पुनमला सुरेश यादव याचा मोठा आधार मिळत होता. त्यातून त्यांच्यामध्ये जवळीक निर्माण होऊन प्रेमसंबंध निर्माण झाले होते.  

या दोघांच्या प्रेमसंबंधात दारु पिऊन त्रास देणारा कालिदास अडसर ठरत असल्याने पतीकडून कायमची सुटका करुन घेण्यासाठी पुनम वाघमारे हिने त्याचा कायमचा काटा काढण्याचे ठरवले होते. त्यासाठी पुनमने कालिदासला कायमचे संपवून टाकण्यास सुरेश यादव याला सांगितले होते. त्यानुसार सुरेश यादव १६ मे रोजी रात्री घराची चावी देण्याच्या बहाण्याने कालिदासकडे गेला होता. त्यानंतर त्याने त्याच्यासोबत गप्पागोष्टी करत त्याला आपल्या रिक्षामधून बाहेर नेवून भरपूर दारु पाजली. दारुमुळे कालीदासची शुध्द हरपल्यानंतर सुरेश यादव याने त्याला रिक्षामधून ठाण्यातील बाळकुम भागातील खाडीकिनारी नेऊन तेथील खाडीमध्ये टाकून दिले.  

पतीला संपवण्यास सांगून स्वतः दिली मिसींगची तक्रार...
आपल्यावर संशय येऊ नये यासाठी पुनमने दुसऱ्या दिवशी रबाले एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाऊन पती कालिदास बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांना तिच्या बोलण्यावर संशय आल्यानंतर पोलिसांनी तिची उलटतपासणी केली. त्यानंतर तिच्या सांगण्यावरुन तिचा प्रियकर सुरेश यादव याने कालिदासला भरपूर दारु पाजून त्याला ठाण्यातील बाळकुम येथील खाडीमध्ये टाकून दिल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी पुनम वाघमारे आणि तिचा प्रियकर सुरेश यादव या दोघांना अटक केली आहे.  

बेपत्ता कालिदासचा शोध...
आरोपी सुरेश यादव याने बाळकुम येथील ज्या ठिकाणी खाडीमध्ये कालिदासला मद्यधुंद अवस्थेत टाकले, त्या भागात पोलिसांनी २ दिवस शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अद्याप कालिदासचा शोध लागलेला नाही. त्यामुळे खाडीमध्ये कालिदास वाहून गेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

सीबीआय, ईडी, सुप्रीम कोर्टाच्या नावाने सायबर फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश