मुलांनी सांगितलेली शिस्त कुटुंबावरच्या प्रेमाची पावती

नवी मुंबई : रस्त्यावरची शिस्त केवळ कायद्याची भिती नसून ती आपल्या कुटुंबावरील प्रेमाची पावती आहे, अशा शब्दांत मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता स्वप्नील जोशी याने नवी मुंबईकरांना साद घातली.

निमित्त होते... नवी मुंबई पोलीस आयुवतालय आयोजित ‘रस्ता सुरक्षा अभियान'चे. आपल्या दिलखुलास अभिनयाने घराघरात पोहोचलेल्या स्वप्नील जोशी याने यावेळी एक अभिनेता म्हणून नाही, तर एका जबाबदार नागरिक आणि पित्याच्या भूमिकेतून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी ‘नवी मुंबईर्'चे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह-पोलीस आयुक्त संजय येनपुरे, महामार्ग वाहतूक विभागाचे पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे, परिमंडळ-१चे उपायुक्त पंकज डहाणे, परिमंडळ-३चे उपायुक्त प्रशांत मोहिते उपस्थित होते.  

यावेळी पुढे बोलताना अभिनेते स्वप्नील जोशी यांनी आई-वडिलांना जे नियम पोलीस किंवा दंड शिकवू शकत नाहीत, ते त्यांची मुले शिकवू शकतात. मुले घराचा आरसा असतात. जर मुलांनी हट्ट धरला की बाबा, हेल्मेट घातल्याशिवाय गाडी काढायची नाही, तर कोणताही बाप तो नियम मोडणार नाही. हेल्मेट घालणे पोलिसांच्या फायद्यासाठी नाही, तर आपल्या जीवासाठी आहे. असे संस्कार आता मुलांनीच पालकांमध्ये रुजवायचे आहेत, असेही स्वप्नील जोशी यांनी यावेळी स्पष्ट केले.  

नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या संकल्पनेतून राबविल्या जाणाऱ्या आई-बाबांचे रिपोर्ट कार्ड या उपक्रमाचे स्वप्नील जोशी यांनी विशेष कौतुक केले. पालक रस्त्यावर कसे वागतात, याचे गुण आता मुले देणार आहेत. सदर उपक्रम केवळ नवी मुंबईतच नव्हे, तर संपूर्ण देशभर राबवला जावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.  

यावेळी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी गेल्या वर्षभरातील अपघाताची आकडेवारी सादर करताना चिंता व्यक्त केली. गेल्या वर्षभरात २६७ जणांचा अपघाती मृत्यू झाला असून त्यापैकी ५० टक्के पेक्षा जास्त दुचाकीस्वार आहेत. आम्ही ९.८० लाख ई-चलन फाडली, हजारो मद्यपींवर कारवाई केली. पण, जोपर्यंत नागरिक स्वतःहून शिस्त पाळत नाहीत, तोपर्यंत अपघाती मृत्यू थांबणार नाहीत, असे पोलीस आयुवत भारंबे यांनी स्पष्ट केले. तसेच त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना छोटा पोलीस म्हणून जबाबदारी सोपवली. तुमचे आई-वडील, भाऊ-बहीण हेल्मेट वापरतात की नाही किंवा सीटबेल्ट लावतात की नाही, याचे निरीक्षण करा. त्यांनी नियम मोडल्यास त्यांना प्रेमाने पण ठामपणे टोका, असे आवाहनही त्यांनी केले.  

यावेळी पोलीस उपआयुक्त तिरुपती काकडे यांनी गेल्या ४ वर्षात नवी मुंबई वाहतूक विभागाकडून राबविण्यात आलेल्या वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती दिली.

दरम्यान, सदर कार्यक्रमाचे आकर्षण ठरले ते, पुरुष आणि महिला यांच्या दोन्ही आवाजात गाणारे प्रसिध्द कलावंत साईराम अय्यर यांचे, ए मेरे वेतन के लोगो... हे गाणे. या गाण्यातून अय्यर यांनी वाहतुकीचे नियम स्वतःसह पालकांना आणि नातेवाईक यांना सांगण्याचे आवाहन केले. यावेळी नवी मुंबईमधील विविध शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

विद्यार्थी करणार पालकांच्या ड्रायव्हींगचे मूल्यमापन