अंबरनाथ मधील वाढत्या गुन्हेगारीविरोधात नगराध्यक्षा ॲक्शन मोडवर

अंबरनाथ :  अंबरनाथ शहराच्या पूर्व आणि पश्चिम परिसरात गेल्या काही काळापासून गर्दुल्ले, चोर आणि नशाखोरांच्या वाढत्या वावरामुळे सर्वसामान्य नागरिक आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात सातत्याने होणाऱ्या घरफोडीच्या घटना आणि रात्रीच्या वेळी वाढलेली असुरक्षितता लक्षात घेता, अंबरनाथच्या नवनिव्रााचित नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांनी २ जानेवारी रोजी पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांची उल्हासनगर येथील परिमंडळ-४ कार्यालयात भेट घेऊन त्यांना वस्तुस्थितीचे गांभीर्य पटवून दिले.

या भेटीदरम्यान नगराध्यक्षांनी शहरात रात्रीच्या वेळी वावरणाऱ्या समाजकंटकांमुळे निर्माण झालेल्या दहशतीच्या वातावरणाबाबत सविस्तर चर्चा केली. अंबरनाथमध्ये ठिकठिकाणी गर्दुल्ल्यांचे अड्डे निर्माण झाले असून, यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असल्याचे त्यांनी पोलीस उपायुक्त गोरे यांच्या निदर्शनास आणून दिले. या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी त्यांनी पोलीस प्रशासनाला लेखी निवेदन दिले असून, अंबरनाथ आणि शिवाजीनगर या दोन्ही पोलीस स्टेशनच्या हद्दीत रात्रीची पोलीस गस्त अधिक तीव्र करण्याची मागणी केली आहे.

नगराध्यक्षांनी केवळ वाहन गस्तच नव्हे, तर गल्लीबोळांमध्ये पायी गस्त वाढवण्यावरही भर दिला आहे. शहरातील जे भाग गुन्हेगारीच्या दृष्टीने संवेदनशील आहेत किंवा जिथे नशाखोरांचा वावर अधिक असतो, अशा 'हॉट स्पॉटस्‌'वर पोलिसांनी कडक तपासणी मोहीम राबवावी, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली. यासंदर्भात पोलीस उपायुक्त गोरे यांनी तात्काळ दखल घेत संबंधित पोलीस ठाण्यांना आवश्यक निर्देश देण्याचे आश्वासन दिले आहे. या भेटीमुळे आता अंबरनाथमधील पोलीस यंत्रणा अधिक सक्रिय होऊन नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नगराध्यक्षांच्या या सक्रियतेचे कौतुक करतानाच, शहरातील इतर प्रश्नांकडेही त्यांनी लक्ष द्यावे, अशी अपेक्षा रहिवाशांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात आपली प्रतिक्रिया नोंदवताना दिनेश देशपांडे यांनी शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मांडला. अंबरनाथ मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक शहराचा मुख्य भाग असून तिथे खाद्यपदार्थ विक्रेते, फळ-भाजी विक्रेते आणि रिक्षा चालकांच्या बेशिस्त पार्किंगमुळे दररोज मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. या गर्दीमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले असून, या चौकातील अतिक्रमणे हटवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी नगराध्यक्षांनी पुढाकार घ्यावा, असे देशपांडे यांनी सुचवले आहे.

दुसरीकडे, सुरक्षेप्रमाणेच मुलभूत सुविधांचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. शहरातील पश्चिम भागातील कोहजगाव आणि आसपासच्या परिसरात नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याची तक्रार रेखा नायर यांनी केली आहे. केवळ गुन्हेगारीच नव्हे, तर पाण्याचे नियोजन आणि रस्ते मोकळे करणे यासारख्या नागरी प्रश्नांवरही नगराध्यक्षांनी तितक्याच प्रभावीपणे काम करावे, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात तेजश्री करंजुले या नागरी समस्यांच्या विळख्यातून अंबरनाथकरांची कशी सुटका करतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘मनसे-सेना युती'ने  भाजप-सेना विरोधात ठोकले दंड