नवी मुंबई विमानतळ समृध्दी-विकासाचे प्रतिक -पंतप्रधान

नवी मुंबई : होणार, होणार असे म्हणता म्हणता अखेरीस बहुप्रतिक्षीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑवटोबर रोजी उद्‌घाटन संपन्न झाले. देशाच्या पायाभूत विकासातील एक ऐतिहासिक टप्पा ठरणारा आणि महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नवी मुंबई विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमान दाखल होताच ‘महाराष्ट्र'चे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योजक गौतम अदानी यांनूी स्वागत केले. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी नवी मुंबई विमानतळाची पाहणी केली आणि विमानतळ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्‌घाटन केले. यामध्ये टर्मिनल-१ आणि रनवे-१ याचा समावेश आहे.

यावेळी नवी मुंबई विमानतळासह मेट्रा-३ च्या आचार्य अत्रे स्टेशन वरळी नाका ते कफ परेड या अखेरच्या टप्प्याचे उद्‌घाटन, मुंबईतील सर्व मेट्रो मध्ये चालणाऱ्या ‘मेट्रो वन ॲप'चे लाँचिंग तसेच शासकीय आयटीआय आणि शासकीय तांत्रिक माध्यमिक विद्यालयांमध्ये अल्प मुदतीचे रोजगारक्षम कार्यक्रमाचे अनावरण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री किंजरापू राममोहन नायडू, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार-नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण, ना. गणेश नाईक, ॲड. आशिष शेलार, ना. मंगलप्रभात लोढा, ना. माधुरी मिसाळ, ना. आदिती तटकरे, ना. प्रताप सरनाईक, ना. भरत गोगावले, भारतातील जपानचे राजदूत ओनो केईची, ‘अदानी ग्रुप'चे चेअरमन गौतम अदानी, खा. श्रीरंग बारणे, खा. धैर्यशील पाटील, अ. प्रशांत ठाकूर, आ. महेश बालदी, आ. मंदाताई म्हात्रे, आ. विक्रांत पाटील, आ. निरंजन डावखरे, आ. चित्रा वाघ, आ. महेंद्र थोरवे, माजी मंत्री कपिल पाटील, लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी आणि विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

विजयादशमी झाली, कोजागिरी झाली, तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा, अशा मराठीत पंतप्रधानांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  भारताच्या प्रगतीचा नवा उड्डाणबिंदू आहे. येथे केवळ विमाने नाही, तर नवी स्वप्ने आणि संधीचे उड्डाण होणार आहे. नवी मुंबईचे प्रदीर्घ काळाचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. मुंबईला अखेर दुसरे विमानतळ मिळाले आहे. तसेच या शहराला भूमीगत मेट्रो देखील मिळाली आहे. भूमिगत मेट्रो विकसित भारताचे चित्र आहे. या विकासकामात योगदान देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करतो. नवी मुंबई विमानतळ समृध्दी आणि विकासाचे प्रतिक ठरेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

विकसित भारताचे काम वेगाने सुरु आहे. जेव्हा पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण होत असते, तेव्हा भारताचा वेग दिसून येतो. २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर हवाई चपल घालणाराही हवाई सफर करणार, अशी ग्वाही मी दिली होती. यासाठी आम्ही प्रयत्नशील राहिलो. २०१४ मध्ये देशात केवळ ७४ विमानतळ होते. आज देशात १६० पेक्षा जास्त विमानतळे आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. आज कौशल्य विकासासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आला आहे. भारत तरुणांचा देश आहे. सध्याचा काळ देशातील तरुणाईला विविध संधी उपलब्ध करून देणार आहे. संपूर्ण देश विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी प्रयत्नशील आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

पतप्रधान मोदी यांनी काँग्रेस सरकारच्या घोटाळ्यांमुळे मेट्रो प्रकल्पाला उशीर झाल्याची टीका केली. ‘मेट्रो'चे भूमीपुजन केले होते; परंतु घोटाळ्यांमुळे लोकांना मेट्रो सेवेसाठी बराच काळ वाट पहावी लागली. तसेच आता अटल सेतू आणि कोस्टल रोडसारख्या प्रकल्पांमुळे गुंतवणूक वाढत असून, एकाच तिकिटाने प्रवास सुलभ होईल. यामुळे तिकिटांसाठी रांगा लावण्याची गरज भासणार नाही. तसेच पंतप्रधान मोदी यांनी स्वदेशी वस्तुंच्या खरेदी आणि भेटवस्तू म्हणून वापरावर जोर दिला. यामुळे पैसा देशात राहील आणि तरुणांना रोजगार मिळेल.

‘दिबां'चे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी...
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात, लोकनेते दि. बा. पाटील यांचे स्मरण करत ‘दिबां'चे निःस्वार्थी कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे अधोरेखित केले. तसेच ‘दिबां'च्या कार्याचा गौरव केला. समाजासाठी शेतकऱ्यांसाठी त्यांनी ज्या सेवाभावी वृत्तीने काम केले, ती आपल्या सर्वांसाठी प्रेरणा आहे. त्यांचे जीवन समाजासाठी काम करणाऱ्यांसाठी नेहमी प्रेरीत करणारा आहे, असेही त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही वर्षानुवर्षे नवी मुंबई विमानतळ होणार असे फक्त ऐकायचो. पंतप्रधान मोदी यांच्याकडे बैठक घेतली आणि अवघ्या १५ दिवसात विमानतळाच्या कामाला मंजुरी मिळाली. आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा आहे. या विमानतळामुळे राज्याचा जीडीपी एक टक्क्याने वाढणार आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात लागतो, तिथे सोने होते. नवीन भारताचा संकल्प  मोदींच्या विश्वासाचे प्रतिक आहे, असे सांगितले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आजचा दिवस महाराष्ट्रासाठी मोठा आहे. नवी मुंबई विमानतळाच्या उभारणीचा प्रवास इतका सोपा नव्हता, तो आता पूर्ण झाला आहे. ना. किंजरापू राममोहन नायडू यांनी आपल्या भाषणात हवाई वाहतुकीचा आढावा मांडला. यावेळी त्यांनी मराठी भाषेतही भाषण केले. ना. मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा शाश्वत विकास होत असल्याचे नमूद केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली