प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
मिरा-भाईंदरमध्ये अमराठी महापौर
भाईंदर : मिरा-भाईंदरमध्ये महापौर पदाच्या निवडीनंतर नवा वाद पेटला आहे. ‘मिरा-भाईंदर'च्या महापौर पदी डिंपल मेहता यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर ‘मराठी एकीकरण समिती'सह ‘मनसे'ने आक्रमक भूमिका घेतली आहे. डिंपल मेहता अमराठी महापौर असल्याने शहराच्या राजकारणात एक नवीन वाद निर्माण झाला आहे. ‘मराठी एकीकरण समिती'ने ‘मनसे'सह महापालिकेबाहेर निदर्शने केली आणि फक्त मराठी महापौरांची मागणी पुन्हा मांडली.
मिरा भाईंदरमध्ये मराठीच महापौर पाहिजे, अशी मागणी ‘मराठी एकीकरण समिती'ने केली होती. मात्र, ‘मराठी एकीकरण समिती'चा विरोध झुगारुन आता अमराठी महापौर बसवल्याने मराठीप्रेमी आक्रमक झाले आहेत. मिरा-भाईंदर महापालिकेच्या महापौर पदी डिंपल मेहता याची निवड झाल्यानंतर मराठीप्रेमी संघटना आक्रमक झाल्या आहेत. अमराठी महापौर केल्याचा आरोप करत ‘मराठी एकीकरण समिती'ने सुभाषचंद्र बोस मैदान जमून विरोध करण्यास सुरुवात केली. यावेळी ‘मनसे'सह ‘मराठी एकीकरण समिती'ने आक्रमक पवित्रा घेतला. नवनिर्वाचित महापौरांविरोधात मोर्चा काढण्यात आला. मराठी महापौर, आमची गरज आमचा अधिकार असे म्हणत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे पोलिसांनी मोर्चा अर्ध्यावरच अडवून आंदोलकांना ताब्यात घेतले.
मराठी राज्य आहे, मराठी शहरे टिकली पाहिजेत, मराठी अस्तित्व टिकले पाहिजे. मुंबई गुजरातमध्ये जाईल या कारणामुळे संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला. अनेकांनी गोळ्या खाल्ल्या. १०७ मराठे हुतात्मा झाले आणि मराठी राज्य स्थापन झाले. आता पुन्हा मुद्दाम मराठी माणसाच्या नाकावर टिच्चून अमराठी महापौर बसवला जात आहे, अशी टीका करत याला आमचा विरोध असल्याची भूमिका ‘मराठी एकीकरण समिती'चे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी मांडली.
दरम्यान, नामदार प्रताप सरनाईक यांनी ‘मराठी एकीकरण समिती'वर टीका करताना सांगितले की, ‘समिती'ने निवडणुकीत २८ भाजपा नगरसेवकांना पराभूत करण्यासाठी उबाठा आणि मनसे या पक्षांना पाठिंबा दिला होता आणि आता निदर्शने होत आहेत. गीता जैन यांच्या महापौर पदाच्या निवडणुकीला आणि नरेंद्र मेहता यांच्या आमदार पदाच्या निवडणुकीला विरोध का झाला नाही? असा सवालही ना. सरनाईक यांनी यावेळी उपस्थित केला.