प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
‘नमुंमपा'च्या शाळा इमारतींचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या वाशी, सेवटर-१५ मधील शाळा क्रमांक-२८ आणि शाळा क्र.११०च्या इमारतीचा स्लॅबचे प्लास्ट कोसळल्याची धक्कादायक घटना २० मार्च रोजी सकाळी घडली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेने महापालिका शाळांच्या इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत महापौर सुजाता पाटील यांनी महापालिकेच्या सर्व शाळांचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले आहेत.
२० मार्च रोजी पार पडलेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजप नगरसेवक सुरज पाटील यांनी या दुर्घटनेबाबत आयत्यावेळचा प्रश्न उपस्थित केला. शाळेच्या इमारतींची दुरवस्था आणि विद्यार्थ्यांच्या जीवाशी होणारा खेळ याकडे त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. आज सुदैवाने कुणाला इजा झाली नाही; पण उद्या मोठी दुर्घटना घडली तर जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
यावेळी सभागृहातील इतर सदस्यांनीही शाळांच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. केवळ इमारतींची अवस्थाच नाही, तर अनेक शाळांमध्ये शिक्षकांची मोठी कमतरता असल्याचेही सदस्यांनी निदर्शनास आणून दिले. भविष्यात विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ नये, यासाठी महापालिकेने तातडीने ठोस पावले उचलावीत, असे मत सर्वपक्षीय सदस्यांनी व्यक्त केले.
सभागृहातील चर्चा ऐकून घेतल्यानंतर महापौर सुजाता पाटील यांनी सदर घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. शाळा क्र.२८ सारखी घटना पुन्हा घडू नये, यासाठी उन्हाळ्याच्या सुट्टीत महापालिकेच्या सर्व शाळा इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करण्यात यावे. ज्या शाळांच्या इमारतींना दुरुस्तीची गरज आहे, त्यांचे काम तातडीने पूर्ण करुन पावसाळ्यापूर्वी त्या सुरक्षित करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
दरम्यान, वाशी, सेवटर-१५ मधील नमुंमपा शाळा क्र.२८ आणि शाळा क्र.११० येथे तिसऱ्या मजल्यावरील टेरेसकडे जाणाऱ्या मार्गावरील स्लॅबचे प्लास्टर मोठ्या प्रमाणात कोसळल्याची घटना २० मार्च रोजी सकाळी घडली आहे. सदरची माहिती मिळताच स्थानिक नगरसेविका अंजली वाळुंज यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. अंजली वाळुंज यांच्या सुचनेनुसात संबंधित प्रशासनाला कळवून अभियंत्यांना त्वरित पाचारण करण्यात आले.
सदर घटनेची गंभीर दखल घेत नगरसेविका अंजली वाळुंज यांनी संपूर्ण शाळा इमारतीचे स्ट्रवचरल ऑडीट तातडीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच शाळेच्या देखभालीसाठी जबाबदार असलेल्या मेन्टेनन्स आणि ॲन्युअल मेन्टेनन्स कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच दीड ते दोन वर्षांपूर्वी दुरुस्तीचे काम केलेल्या कंत्राटदाराविरुध्द कारवाई करुन त्याला काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी देखील अंजली वाळुंज यांनी केली आहे.
घटनास्थळी समाजसेवक विजय वाळुंज, अजय वाळुंज, कार्यकारी अभियंता पंढरीनाथ चवडे, उपअभियंता पावरा, शाळेचे शिक्षकवर्ग आदि उपस्थित होते.