संस्कार, मराठी भाषेचा स्वाभिमान हीच काळाची गरज -ना. गणेश नाईक

नवी मुंबई : बालपणापासूनच मुलांच्या मनावर मराठी भाषा, आपली समृध्द संस्कृती आणि लोकशाही मूल्यांचे संस्कार रुजवणे प्रत्येक पालकाचे आणि समाजाचे कर्तव्य आहे. अशा प्रकारच्या संमेलनांमुळे बालमनात साहित्य, कला आणि सामाजिक जाणीव विकसित होण्यास मोठी मदत होते, असे प्रतिपादन वनमंत्री गणेश नाईक यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या ‘मराठी भाषा विभाग'च्या वतीने वाशी येथे आयोजित ‘बाल मराठी संमेलन २०२६'च्या उद्‌घाटनप्रसंगी ना. नाईक बोलत होते.

वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात (साने गुरुजी बालनगरी) आयोजित या दोन दिवसीय संमेलनाचे उद्‌घाटन ना. गणेश नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी व्यासपीठावर महापौर सुजाता पाटील, ‘मराठी भाषा विभाग‘बेलापूर'चे प्रधान सचिव डॉ. किरण कुलकर्णी, दिग्दर्शक-अभिनेते महेश कोठारे, ‘राज्य मराठी विकास संस्था'चे संचालक डॉ. शामकांत देवरे, ‘महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ'चे अध्यक्ष डॉ. रविंद्र शोभणे, प्रसिध्द सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालव, जेष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, जेष्ठ बालनट्यकर्मी प्रतिभा मतकरी, ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन'चे अध्यक्ष विश्वास पाटील, जेष्ठ नाटयकर्मी सुप्रिया विनोद, तसेच मराठी भाषा आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवरांंची उपस्थिती होती.

ना. गणेश नाईक यांनी संत परंपरेचा गौरवपूर्ण उल्लेख केला. संत ज्ञानेश्वरांनी ‘हे विश्वची माझे घर' असा महान विचार मांडून मानवतेचा संदेश दिला. आज जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा' दर्जा दिला आहे, तेव्हा आपली जबाबदारी अधिक वाढली आहे. तो दर्जा मिळणे प्रत्येक मराठी भाषिकाच्या संघर्षाचा आणि अस्मितेचा विजय आहे, असे ना. नाईक म्हणाले.

अभिनेते महेश कोठारे यांनी मुलांशी संवाद साधताना त्यांच्या कल्पनाशक्तीला साद घातली. मी माझ्या कारकिर्दीत ‘बोलका बाहुला' सारख्या पात्रांच्या माध्यमातून मुलांचे मनोरंजन करण्यासोबतच त्यांच्या विचारांना दिशा देण्याचा प्रयत्न केला. मराठी भाषा  केवळ बोलण्याची भाषा नसून ती आपली ओळख आहे, असे त्यांनी नमूद केले. पद्मश्री अच्युत पालव यांनीही आपल्या अक्षरांच्या जादूने मराठी भाषेचे सौंदर्य उपस्थितांसमोर मांडले.

तर तंत्रज्ञानाच्या युगात मुलांनी मोबाईलमध्ये न अडकता मराठी पुस्तके वाचण्यावर आणि शुध्द लेखनावर भर द्यावा, असे आवाहन महापौर सुजाता पाटील यांनी यावेळी केले.

संमेलनात पोवाडा, भारुड आणि बालनाट्य अशा विविध कलाप्रकारांचे सादरीकरण करण्यात आले. यामुळे बालनगरी अक्षरशः दुमदुमून गेली होती.

‘मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ'चे अध्यक्ष डॉ. रविंद्र शोभणे यांनी संमेलनाच्या नियोजनाची माहिती दिली, तर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे आणि विश्वास पाटील यांनी मुलांच्या साहित्यातील योगदानावर प्रकाश टाकला.

सदर संमेलनाला ‘नवी मुंबई'चे उपमहापौर दशरथ भगत, स्थायी समिती सभापती अशोक पाटील, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, आरोग्य समिती सभापती डॉ. जयाजी नाथ, नगरसेविका स्वप्ना गावडे यांच्यासह हजारो शालेय विद्यार्थी-शिक्षकांची उपस्थिती होती. दरम्यान, नवी मुंबई केवळ आधुनिक शहर नसून ते सुसंस्कृत नागरिकांचे शहर आहे, याची प्रचिती या संमेलनातून आली. या संमेलनाच्या माध्यमातून नवी मुंबईच्या सांस्कृतिक वैभवात एक मानाचा तुरा रोवला गेला असून, बालसाहित्य आणि भाषेच्या संवर्धनासाठी एक ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कल्याणमध्ये घुमणार भारतीय संस्कृतीचा हुंकार