प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
भिवंडी महापालिकेचा ११७९ कोटी १० लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर
भिवंडी : भिवंडी महापालिकेचा ७३ लाख ९६ हजार शिल्लक दर्शविणारा ११७९ कोटी १० लाख ९७ हजार रुपयांचा २०२६-२०२७ चा अर्थसंकल्प आयुक्त अनमोल सागर यांनी विशेष महासभेत महापौर नारायण चौधरी यांना सादर केला. याप्रसंगी उपमहापौर तारिक मोमिन, अतिरिक्त आयुक्त वि्ील डाके, नयना ससाणे व्यासपीठावर उपस्थित होते. विशेष म्हणजे या सभेस मोजके नगरसेवक उपस्थित होते.
आयुक्त सागर यांनी सविस्तर अर्थसंकल्पाचे सविस्तर वाचन न करता ठळक तरतुदींचा उल्लेख असलेली प्रस्तावना वाचन केल्यानंतर अवघ्या १५ मिनिटामध्ये या अर्थसंकल्पीय विशेष सभेचे सुप वाजून सभा तहकूब करण्यात आली. आता ३० मार्च रोजी अर्थसंकल्पावर विशेष चर्चा करण्यासाठी महासभा आयोजित करण्यात येत असल्याचे महापौर नारायण चौधरी यांनी जाहीर केले.
आयुक्त अनमोल सागर यांनी यावेळी केलेल्या भाषणात सन २०२५-२६ चे सुधारित आणि सन २०२६-२७ मूळ अर्थसंकल्प मंजुरीकरिता सादर करीत असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, २०२५-२०२६ चे १११७ कोटी ५२ लाख ५४ हजाराचे सुधारित अर्थसंकल्प आणि सन २०२६-२०२७ चा ७३ लाख ९६ हजार शिलकीचा ११७९ कोटी १० लाख ९७ हजार रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
महिला-बालकल्याण, दुर्बल, दिव्यांगांसाठी ५ टक्के तरतूद...
महिला-बालकल्याण, दुर्बल घटक कल्याण आणि दिव्यांग कल्याण या तीन विभागांसाठी मूळ अर्थसंकल्पातून महसुली उत्पन्नातून बांधीव खर्च वजा करुन उर्वरित उत्पन्नाच्या ५ टक्के अर्थात ३ कोटी २६ लाख ४० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
पाणी पुरवठा उत्पन्न कमी, खर्च अधिक...
पाणी पुरवठा आणि मलनिःस्सारण, शिक्षण विभाग, वृक्ष संवर्धन अर्थसंकल्पात उत्पन्न कमी आणि खर्च अधिक असल्याने या खर्चासाठी अर्थसंकल्पात पाणीपुरवठाकरिता१०५ कोटी १४ लाख ९१ हजार तर शिक्षण विभागासाठी ७६ कोटी ११ लाख २६ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
शहरातील पायाभूत सुविधांसाठी विशेष तरतूद...
शहराचा सर्वांगीण विकास कामासाठी अर्थसंकल्पात विविध विभागांतर्गत तरतूद करण्यात आली असल्याचे आयुक्त अनमोल सागर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे.
३० मार्च रोजी अर्थसंकल्पावर चर्चा - महापौर चौधरी
आयुक्त अनमोल सागर यांच्याकडून अर्थसंकल्प सादर केल्यानंतर २५ मार्च पासून महासभेत सलग चर्चा करण्यासाठी बैठक आयोजनाची घोषणा महापौर नारायण चौधरी यांनी केली. ३ वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर नव्यानेच लोकप्रतिनिधी सभागृहात निवडून आले आहेत. त्यांच्या हाती अर्थसंकल्पाची प्रत मिळाल्यानंतर त्याचा अभ्यास करण्यासाठी वेळ मिळावा. नगरसेवकांच्या मनामध्ये शहर विकासंदर्भात काही संकल्पना आहेत. त्या सभागृहात मांडता याव्यात, यासाठी किमान ४ दिवस वेळ मिळावा, अशी विनंती शिवसेना नगरसेवक मनोज काटेकर यांनी सभागृहाला केली. त्यास ‘काँग्रेस'चे प्रशांत लाड आणि ‘भाजपा'चे सुमित पाटील यांनी पाठिंबा दर्शवित सभागृहास विनंती केली. यानंतर महापौर चौधरी यांनी अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी ३० मार्च रोजी सकाळी ११ वाजता विशेष महासभेचे आयोजन केल्याची घोषणा केली.