वातावरणीय बदलामुळे बिघडले तूर, वालाच्या शेंगांच्या शेतीचे गणित
भिवंडी : अवकाळी पावसाने प्रथमतः खरीप हंगामातील भातशेतीतून तोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांकडून हिरावून घेतला. त्यानंतर रब्बी हंगामात भाजीपाला लागवड आणि कडधान्याची नासाडी केली आहे. त्यातच आता ऐन गुलाबी थंडीत वातावरणीय बदलाचा फटका तूर, वालाच्या शेंगा उत्पादक शेतकऱ्यांनाही बसल्याचे चित्र ठाणे, पालघर जिल्ह्यातून समोर येत आहे.
आतापर्यंत वालाच्या शेंगांचे उत्पादनच झालेले नाही. तर तूर शेंगाचे उत्पादनही मुबलक प्रमाणात झाल्याचे शेतातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे शेंगा प्रेमींना ग्रामीण भागातील गावठी शेंगांसाठी वाट पहावी लागणार आहे. तत्पूर्वी तूर, वालाच्या शेंगांची आवक मार्गशिष महिन्यापासून चांगल्या प्रमाणात होत होती. मात्र, मागील १-२ वर्षांपासून अवकाळी पाऊस अधून मधून हजेरी लावत असल्याने वालाच्या शेंगांचे उत्पादन लांबणीवर जात असल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, सद्यस्थितीत ठाणे, पालघर मधील भाजीपाला बाजारातील उपलब्ध असलेल्या वालाच्या शेंगा अधिकतम नाशिक जिल्ह्यातून येत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे. त्यामुळे ऐन थंडीत शेंगाप्रेमींच्या जिभेला हव्या असणाऱ्या ग्रामीणमधील गावठी शेंगांच्या चवीचा आस्वाद घ्ोता येत नसून गावठी शेंगांची पारख असलेल्या ग्राहकांची हिरमोड होत आहे. असे ग्राहक नाशिक जिल्ह्यातील शेंगा खरेदी करण्यास कानाडोळा करत असून ते गावठी शेंगांच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसून येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पूर्वीपासून खरीप हंगामातील भात शेतीच्या लावणीच्या वेळेला शेत बांधावरील शेतात तूर, वालाच्या शेंगांच्या बियाणांची लागवड केली जात होती. या शेंगांचे उत्पादन मार्गशिष महिन्याच्या प्रारंभी होऊन बाजारात अशा गावठी शेंगांची आवक मोठ्या प्रमाणात होत होती. तर भात कापणी नंतर लागवड केलेल्या वालाच्या शेंगांचे उत्पादन जानेवारी, फेब्रुवारी पर्यंत मोठ्या प्रमाणात होत होते. परंतु, मागील काही वर्षांपासून अवकाळीने भातशेतीसह भाजीपाला, कडधान्याचा अक्षरशः चुराडा केला असतानाच आता भातशेतीतील लावणी आणि कापणीचा कालावधी लांबल्याने तूर, वालाच्या शेंगांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचेही गणित कोलमडले आहे. शेंगांच्या उत्पादनाची प्रतिक्षा करावी लागत असल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावा लागत आहे. यासह गावठी शेंगांचे उत्पादन कमी होऊन शेंगांची बाजारात आवक कमी झाल्याने शेंगाप्रेमींच्या जिभेचे चोचले बंद झाले आहेत.
त्यातच अलिकडील बदलत्या हवामान स्थितीचा पिकांवर परिणाम होत असून ठाणे, पालघर जिल्ह्यात चालू हंगामात पावसाचा कालावधी अपेक्षेपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे जमिनीत जास्त काळ ओलावा टिकून राहिला. परिणामी, खरीप पिकांपैकी भात कापणीस विलंब झाला. याचा थेट परिणाम म्हणून रब्बी हंगामातील कडधान्य पिकांच्या पेरणीस उशीर झाला. विशेष म्हणजे खरीपातील वाल आणि तूर पिकांच्या वाढीवरही या हवामान बदलाचा प्रतिकुल परिणाम झाला आहे. दीर्घकाळ ओलावा आणि सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे या पिकांत फुलोरा येण्यास विलंब झाला असून पिकांची वाढ मंदावलेली दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक उत्पादन बाजारात कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने इतर जिल्ह्यांमधून येणारी आवक वाढलेली आहे. दरांमध्ये अस्थिरता दिसत असली तरी कृषी विभाग परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून असून शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. तर हवामानातील बदलानुसार पिक व्यवस्थापन, कीड-रोग नियंत्रण आणि आंतरमशागत बाबत शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत आवश्यक मार्गदर्शन करण्यात येत आहे.