न्याय आणि नात्यांचा समन्वय!

नवी मुंबई: महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईतील बेलापूर येथील कौटुंबिक न्यायालयाच्या 'राष्ट्रीय लोक अदालत'ने तुटण्याच्या मार्गावर असलेल्या अनेक कुटुंबांना नवी दिशा दिली आहे. न्याय आणि नात्यांच्या समन्वयातून या 'लोक अदालत'मध्ये १० जोडप्यांनी घटस्फोटाचा विचार सोडून पुन्हा नव्याने संसार सुरु करण्याचा भावनिक निर्णय घेतला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात आणि मुलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

कौटुंबिक वादासंबंधी एकूण ४९ प्रकरणे 'लोक अदालत'मध्ये ठेवण्यात आली होती, त्यापैकी १३ प्रकरणांचा यशस्वीरित्या निकाल लावण्यात आला. यातील १० जोडप्यांनी समुपदेशनानंतर आपले मतभेद बाजूला सारत 'नांदा सौख्यभरे' असा निर्णय घेतला. या जोडप्यांचा रेशीमगाठी पुन्हा जुळल्यामुळे कुटुंबियांना तर आनंद झालाच, पण त्यांच्या मुलांचा आनंदही द्विगुणित झाला. याशिवाय, अन्य ३ प्रकरणांमध्ये पक्षकारांनी आपसांत तडजोड करून त्यांची प्रकरणे मागे घेतली.

सन्मान आणि सहकार्य

पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतलेल्या या जोडप्यांचा नवी मुंबई कोर्ट बार संघटना आणि कौटुंबिक न्यायालय, बेलापूर यांच्यातर्फे 'नांदा सौख्यभरे'चे प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

या 'लोक अदालत'चे पॅनल प्रमुख म्हणून बेलापूर न्यायालयात जिल्हा न्यायाधीश-२ तथा अतिरीक्त सत्र न्यायाधीश मकरंद मांडवगडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. पॅनल सदस्य म्हणून 'नवी मुंबई बार कोर्ट संघटना'च्या सदस्या ॲड. अमृता शारकर उपस्थित होत्या.

तसेच या 'लोक अदालत'च्या यशस्वी आयोजनासाठी कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश सुभाष काफरे आणि चंद्रशेखर मराठे, जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरीक्त सत्र न्यायाधीश, बेलापूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

सदर 'लोक अदालत'च्या यशस्वीतेसाठी कौटुंबिक न्यायालयाचे प्रबंधक जी. एस. हिरवे, सहाय्यक अधीक्षक राजेश म्हात्रे यांच्यासह संपूर्ण न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. त्याचबरोबर 'नवी मुंबई बार कोर्ट संघटना'चे अध्यक्ष सुनिल मोकल, उपाध्यक्ष संदीप रामकर, सचिव विकास म्हात्रे आणि इतर कार्यकारीणी सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला. या सर्वांच्या प्रयत्नांमुळेच सदर कुटुंब समन्वय पर्व यशस्वी झाले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ‘नमुंमपा'च्या उद्यान विभागात १०० कोटींचा घोटाळा