प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
अंबरनाथ ‘शिवसेना'चा कायम बालेकिल्ला -उपमुख्यमंत्री शिंदे
अंबरनाथ : अंबरनाथ शहर पूर्वीही ‘शिवसेना'चे होते, आजही ‘शिवसेना'चेच आहे आणि उद्याही ‘शिवसेना'चेच राहणार, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे व्यक्त केला. अंबरनाथ येथील जाहीर सभेत बोलताना त्यांनी विरोधकांवर कडाडून टीका करत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनिषा वाळेकर यांच्यासह त्यांचे सर्व उमेदवार रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी होतील, अशी ग्वाही दिली.
अंबरनाथ पूर्व येथील वेल्फेअर सेंटर येथे ‘शिवसेना'या प्रचारसभेत शिंदे म्हणाले की, आज अंबरनाथचे चित्र पूर्णपणे बदलले असून जवळपास सर्व रस्ते काँक्रीटचे झाल्याने शहर खऱ्या अर्थाने धुळमुक्त झाले आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष मनिषा वाळेकर आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीमुळे या छोट्या शहराला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नवी ओळख मिळाली आहे. अंबरनाथचा विकास केवळ बोलण्यापुरता मर्यादित नसून, तो प्रत्यक्षात उतरवला आहे. प्राचीन शिवमंदिर आणि तेथील ‘आर्ट फेस्टिव्हल'च्या माध्यमातून शहराच्या वैभवात भर पडली असून ‘अंबरनाथ इज बेस्ट' ते आम्ही कृतीतून सिध्द केले आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठामपणे सांगितले.
विरोधकांचा समाचार घेताना ना. एकनाथ शिंदे म्हणाले की, मी मुख्यमंत्री झाल्यापासून काही लोकांची ‘पोटदुखी' वाढली आहे. अशा लोकांच्या पोटदुखीवर उपचार करण्यासाठीच आम्ही ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' सुरु केला आहे, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी विरोधकांना लगावला. ‘महाविकास आघाडी'चे नेते निवडणूक काळात कुठेही फिरकले नाहीत आणि त्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले. विकासासाठी सरकारकडे पैशांची अजिबात कमतरता नाही आणि अंबरनाथच्या प्रलंबित कामांसाठी शासन सदैव खंबीरपणे पाठीशी उभे राहील, असा शब्द ना. शिंदे यांनी यावेळी अंबरनाथवासियांना दिला.
शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांवर भाष्य करताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सूर्योदय सोसायटीला लावलेला दंड आकारला जाणार नाही, अशी मोठी घोषणा केली. तसेच भीमनगर आणि दत्तकुटीर येथील एसआरए प्रकल्पांच्या माध्यमातून रहिवाशांचे जीवनमान बदलण्याचे आश्वासन दिले. अंबरनाथमध्ये अद्ययावत रुग्णालय उभारले जाईल, जेणेकरुन नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळतील. शेवटी २० डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानात विकासाचा हा ‘भगवा' कायम राखण्याचे आणि सोन्यासारख्या भविष्यासाठी ‘महायुती'ला भरघोस मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
याप्रसंगी खासदार डॉ श्रीकांत शिंदे, कल्याण जिल्हा शिवसेनाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर, उल्हासनगर शिवसेना प्रमुख राजेंद्र चौधरी, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, मनिषा वाळेकर यांच्यासह इतर पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ‘महायुती'चे कार्यकर्ते उपस्थित होते.