उत्तम कार्यामुळे वन खात्याचा संबंध भारतामध्ये सन्मान वाढेल - वनमंत्री गणेश नाईक
नवी मुंबई : राज्याचे वनखाते अतिशय उत्कृष्ट काम करीत असून त्यामुळे संबंध भारतामध्ये वनखात्याचा सन्मान वाढेल, असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी वाशी येथे आयोजित वन विभागाच्या पदक वितरण सोहळ्यामध्ये केले.
जागतिक वन दिनानिमित्त वनविभागाच्या पदक वितरण सोहळ्यामध्ये ना. गणेश नाईक यांच्या हस्ते वनविभागाचा पदक वितरण सोहळा सिडको कन्वेंशन सेंटर, सेक्टर-30, वाशी येथे संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्र वन विभागातील वनसंरक्षणाच्या प्रभावी कामाबद्दल तसेच वन सेवेतील काम करणारे अधिकारी/कर्मचारी यांना सन 2020-21, सन 2021-22 व सन 2022-23 वर्षाचे पदक वितरण करण्यात आले.
यावेळी महसूल व वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वन संरक्षक (वनबल) शोमिता बिस्वास, एम. श्रीनिवास रेड्डी, एम श्रीनिवास राव, संजय गौर, विवेक खांडेकर, ऋषिकेश राजन, एस व्ही रामराव,के प्रदीपा, एन.आर प्रवीण आदी मान्यवर उपस्थित होते.
वन मंत्री गणेश नाईक पुढे म्हणाले की, 100 दिवस कृती आराखड्यामध्ये ठरविल्याप्रमाणे वन खात्याने वनांची वाढ करण्याचे इष्टांक पूर्ण केले आहे, ही अभिमानाची बाब आहे. वने ही राज्याची संपत्ती आहे. त्याचे आपण जतन केले पाहिजे. आपण सर्व एक कुटुंब आहोत. आपल्या कर्तव्याला अनुसरून आपण सर्वांनी जोमाने काम केले पाहिजे. आजचा हा पुरस्कार सोहळा आपल्या सर्वांना आत्मविश्वास देणारा आहे. आपल्या शौर्याचा सन्मान करणारा आहे. या पुरस्कारामुळे काम करणाऱ्या सर्वांना प्रेरणा मिळणार आहे.
या सर्वांनी आपल्या कर्तव्याशी जागून आपल्या जीवाची पर्वा न करता कार्य केले आहे. त्यांचा हा सन्मान आहे. 21 मार्च जागतिक वन दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वनांचे रोपण केले पाहिजे, त्यांचे संगोपन केले पाहिजे. वन विभागातील रिक्त पदांचा आढावा घेवून लवकरच नवीन लोकांची भरती करण्यात येणार आहे. वन खात्याला ज्या ज्या बाबींची गरज आहे त्या सर्व बाबी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, असे नाईक म्हणाले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन व ॲपचे अनावरण करण्यात आले .
महसूल व वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांनी आपल्या मनोगतामध्ये वनखात्याचे कामकाज कशा प्रकारे चालते याची माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल) प्रमुख शोमिता बिस्वास यांनी केले. यावेळी त्यांनी जागतिक वनदिवस व पुरस्कार सोहळ्याची माहिती दिली.