प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
सामान्य माणसासाठी परवडणारे रुग्णालय उभारणार
नवी मुंबई : स्वतः रुग्णालयात उपचार घेत असताना, दुसऱ्याच्या वेदनेची जाणीव होणे आणि त्यातून समाजसेवेचा मोठा संकल्प सोडणे, खरोखरच कौतुकास्पद आहे. सध्या सोशल मीडियावर एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सर्वसामान्यांना परवडेल असे रुग्णालय उभारणार, असा ठाम निर्णय घेत एका ध्येयवेड्या व्यवतीत्वाने आरोग्याच्या क्षेत्रातील नव्या लढाईचे रणशिंग फुंकले आहे. या ध्येयवेड्या व्यवतीमत्वाचे नाव आमदार मंदाताई म्हात्रे आहे.
रुग्णशय्येवरुन समाजसेवेचा संकल्प...
रुग्णालयात उपचार घेत असताना मनात येणाऱ्या अस्वस्थ विचारांना आ. मंदाताई म्हात्रे यांनी वाट करुन दिली आहे. आपण उपचार घेऊ शकतो; पण अनेकांना हेच परवडत नाही, मग त्यांचे काय? असा प्रश्न त्यांना सतावत होता. सदरची केवळ शारीरिक वेदना नसून मनाला भिडणारी सामाजिक जाणीव आहे, असे आमदार म्हात्रे यांनी सोशल मिडियावरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
काय आहे नेमकी योजना?
केवळ हळहळ व्यक्त न करता, त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्य नागरिकांना जिथे सन्मानाने, सेवाभावाने आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘परवडणाऱ्या दरात' उपचार मिळतील, अशा रुग्णालयाची उभारणी करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. सदरची त्यांच्यासाठी केवळ एक योजना नसून, ती एक सामाजिक जबाबदारी आणि सामान्य जनतेला दिलेले ‘वचन' असल्याचे त्यांनी आवर्जुन नमूद केले.
सहकार्याचे आवाहन...
या प्रवासात अनेक अडथळे येऊ शकतात, याची जाणीव असल्यानेच त्यांनी टीकाकारांना किंवा अडथळे निर्माण करणाऱ्यांना एक भावनिक साद घातली आहे. अडथळे निर्माण करण्यापेक्षा सहकार्य करा, कारण लढाई माझी एकटीची नाही, तर उपचारांसाठी झगडणाऱ्या प्रत्येक सामान्य माणसाची आहे, असे आवाहन आ. मंदाताई म्हात्रे यांनी म्हटले आहे.
सध्या सदर पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, नेटकऱ्यांकडून आ. मंदाताई म्हात्रे यांच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे. लवकरच पूर्णपणे बरे होऊन या सेवाकार्यासाठी पुन्हा मैदानात उतरण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला असून, त्यांना सर्व स्तरातून शुभेच्छा आणि प्रार्थना मिळत आहेत.