एजन्सीच्या दुर्लक्षामुळे चार्जिंग स्टेशन धूळखात पडून

खारघर : वाढत्या नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर प्रदुषण कमी करण्याच्या उद्देशाने शासनाने इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केल्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जिंग करण्यासाठी ‘महावितरण'च्या खारघर, सेक्टर-२ मधील उपस्टेशन मध्ये ५ वर्षांपूर्वी चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले होते. मात्र, देखभाल करणाऱ्या एजन्सीने दुर्लक्ष केल्यामुळे चार्जिंग स्टेशन धूळखात पडून असल्यामुळे इलेक्ट्रिक वाहन चालकांमध्ये नाराजी पसरली आहे.

पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमती आणि होणाऱ्या वायू प्रदुषणाला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहन घेण्याकडे नागरिकांचा कल वाढत असल्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांना चार्जिंग करता यावे यासाठी खारघर, सेक्टर-२ मधील ‘महावितरण'च्या सब-स्टेशन मध्ये ५ वर्षांपूर्वी चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले होते. यासाठी एजन्सीची नेमणूक केली होती. विशेष म्हणजे सायन-पनवेल महामार्गावरुन धावणाऱ्या इलेक्ट्रिक वाहन चालकांना विना अडथळा वाहन चार्जिंग करता यावे यासाठी सदर स्टेशन सुरु करण्यात आले होते.  वाहन चालकांनी गुगलवर शोध घेतल्यास लोकेशनद्वारे वाहन चालकांना सहज उपलब्ध होत असे. मात्र, देखभाल करणाऱ्या एजन्सीने या स्टेशनकडे दुर्लक्ष केल्यामुळे गेल्या २ वर्षांपासून सदर स्टेशन धूळखात पडून असल्यामुळे  इलेक्ट्रिक वाहन चालकांमध्ये नाराजी पसरली आहे.

या संदर्भात एजन्सीच्या कर्मचारी अजमल रेझा यांच्याकडे विचारणा केली असता, सदर एजन्सी सोडून ३ वर्षाहून अधिक काळ झाला आहे. तसेच सदर एजन्सीचे संपर्क क्रमांक नाही, असे त्यांनी सांगितले. तर खारघर महावितरण कार्यालयाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता व्यंकटेश कासल यांच्याशी संपर्क केला असता ‘महावितरण'कडून वीज पुरवठा सुरु असल्याचे ते म्हणाले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाशीतील रहेजा रेसिडेन्सी आग प्रकरण