निवडून आलेल्या कामगार संघटना विरोधात निषेध सभा
उल्हासनगर : काही दिवसांपूर्वी सेंच्युरी कंपनीच्या ‘कामगार संघटना'ची निवडणूक संपन्न झाली. मात्र, निवडणुकीत जी कामगार संघटना निवडून आली, त्या ‘संघटना'ने उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप ‘रेयॉन कामगार संघटना'ने केला आहे. या संदर्भात कंपनीच्या गेटसमोर निषेध सभा २२ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती. या सभेत कंपनीचे कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कामगार संघटनेच्या त्रैवार्षिक निवडणुकीचा कार्यकाळ संपल्यानंतर, बरखास्त ‘संघटना'ने कोणतीही पूर्वसूचना न देता कंपनीपासून ५ कि.मी. अंतरावर गुपचूप आणि असंविधानिक निवडणूक घेतल्याचा निषेध या सभेत करण्यात आला. तसेच कामगारांच्या न्याय हक्कासाठी ‘सेंच्युरी रेऑन संघर्ष समिती'ची स्थापना करण्यात आली. गेल्या २० वर्षात प्रथमच अशा प्रकारची निषेध सभा कंपनीच्या गेट समोर आयोजित करण्यात आली होती. या सभेला वसईचे आगरी सेना प्रमुख कैलाश पाटील, मुंबईचे कामगार नेते संतोष सावंत, ‘आगरी सेना'चे युवा नेते राहुल साळवी, भिवंडीचे युवा नेते मयूर तांडेल, ठाणे जिल्हाप्रमुख चंद्रकांत ठाणकर, ॲड. आय. पी. सिं आदि उपस्थित होते.
या सभेच्या अध्यक्षपदी जेष्ठ कामगार नेते राजाराम साळवी यांची निवड करण्यात आली. जोपर्यंत मतपत्रिकेद्वारे निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत ‘कामगार संघर्ष समिती'ला कंपनी प्रशासन आणि शासनाशी चर्चा करुन कामगार हिताचे निर्णय घेण्याचे अधिकार प्रतिनिधी म्हणून अनिल पाटील, ज्ञानेश्वर पाटील, राजेश भोईर, संतोष भोईर, राजू पारीख, राजू कंडारे यांना असल्याची सूचना यावेळी ‘समिती'चे सल्लागार मोहन कंडारे आणि राजेंद्र सुर्वे यांनी दिली.
या ‘निषेध सभा'वेळी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला होता. कल्याण-नगर राज्य महामार्गाला लागूनच सेंच्युरी कंपनी आहे. या महामार्गाला नेहमी वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे वाहतूक पोलिसांना देखील तारेवरची कसरत करावी लागली. या संदर्भात मोहन कंडारे यांनी पोलीस, वाहतूक पोलीस आणि उल्हासनगर महापालिका प्रशासन यांचे आभार मानले.