नवी मुंबईत ‘बुलडोझर'चा धडाका सुरुच

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांचा ‘बुलडोझर' आता अंमली पदार्थ तस्करांच्या अवैध मालमत्तेवर पूर्ण क्षमतेने फिरु लागला आहे. दिघा परिसरातील शांताबाई करंडेकर टोळीचे साम्राज्य उध्वस्त केल्यानंतर, आता नेरुळमधील सीवुडस्‌ रेल्वे स्थानक परिसरात अंमली पदार्थांचा अड्डा बनलेले भंगाराचे दुकान नवी मुंबई पोलिसांनी जमीनदोस्त केले आहे. उत्तर प्रदेशच्या धर्तीवर सुरु झालेल्या या कारवाईमुळे नवी मुंबईतील अंमली पदार्थ तस्करांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

सीवुडस्‌ रेल्वे स्थानकाच्या बाजुला असलेल्या सेक्टर-२८ मध्ये राजू राठोड नावाचा इसम भंगार व्यवसाय करायचा. त्याच्यावर अंमली पदार्थ विरोधी पथकाने अंतर्गत २ गंभीर गुन्हे दाखल केले असून, तो सध्या कारागृहात आहे. मात्र, त्याच्या कारावासाचा फायदा घेऊन त्याची पत्नी त्याच ठिकाणी भंगार व्यवसायाच्या नावाखाली गुपचूप अंमली पदार्थांची तस्करी करत होती. पोलिसांच्या निगराणीत सदर बाब निदर्शनात आल्यानंतर त्यांनी तातडीने पावले उचलली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या परिसराची पाहणी केली. अंमली पदार्थांचा अड्डा म्हणून वापरले जाणारे सदर भंगाराचे दुकान बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट होताच, पोलिसांनी नवी मुंबई महापालिकेशी समन्वय साधला. त्यानंतर ३० एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास पोलिसांनी बुलडोझरच्या सहाय्याने सदर दुकान पूर्णपणे निष्कासित केले. दुकानातील सर्व भंगार साहित्य टेम्पोमध्ये भरुन थेट डम्पिंग ग्राऊंडला रवाना करण्यात आले असून, सदर परिसर पूर्णपणे रिकामा करण्यात आला आहे.

‘युपी पॅटर्न'ची नवी मुंबईत चर्चा...
गेल्या काही दिवसांत नवी मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थ विक्रेत्यांविरोधात कडक पवित्रा घेतला आहे. २९ एप्रिल रोजी दिघा परिसरात शांताबाई करंडेकर हिने ड्रग्सच्या पैशातून उभारलेली आलिशान इमारत पोलिसांनी बुलडोझरने पाडली आहे. अंमली पदार्थांच्या पैशातून उभी केलेली कोणतीही बेकायदेशीर मालमत्ता खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश सीवुडस्‌ मधील या कारवाईने पोलिसांनी दिला आहे. गुन्हेगारी कारवायांना केवळ अटक करुन न थांबता, गुन्हेगारांचे आर्थिक कंबरडे मोडण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी अवलंबलेली ‘बुलडोझर' नीती शहरात चर्चेचा विषय ठरत असून, नागरिक पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे स्वागत करत आहेत. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बेघरांचा निवाऱ्यासाठी उड्डाणपुलांखाली आसरा