कल्याण स्टेशन परिसरातील समस्यांसाठी राणी कपोते यांचे बेमुदत उपोषण
कल्याण : कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात सुरु असणारे अनैतिक धंदे, वेश्याव्यवसाय, वाहतूक कोंडी, अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त असून नागरिकांना भेडसावणाऱ्या या समस्यांना वाचा फोडण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या राणी कपोते यांनी स्टेशन जवळील वाहनतळाबाहेर सह्यांची मोहिम राबवली असून त्या बेमुदत उपोषणाला देखील बसल्या आहेत.
ऐतिहासिक कल्याण शहराच्या सर्वांगीण विकास हाच ध्यास घेऊन कल्याण रेल्वे स्टेशन आणि रेल्वे स्टेशन परिसरातील तसेच स्काय वॉक वरील अस्वच्छता आणि दुर्गंधी, अनैतिक धंदे (वैश्या व्यवसाय, मटका, जुगार, सट्टा, चरसी, गरदुल्ले, अंमली पदार्थ, ड्रग्स, एमडी पावडर सेवन-विक्री), फेरीवाले, परिसरातील वाहतूक कोंडी, परिसरातील आणि शहरातील अत्यंत धीम्या गतीने सुरु असलेली विकास कामे, पार्कंग समस्या तसेच स्काय वॉकवरील आणि परिसरातील सीसीटिव्ही, पब्लिक अनाऊंसमेंट सिस्टीम तसेच इतर गंभीर विषयांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राणी कपोते यांनी बेमुदत उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या या उपोषणाला अनेक सामाजिक संस्थांचा पाठिंबा मिळत असून नागरिकांचा देखील उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.