‘मनसे-सेना युती'ने  भाजप-सेना विरोधात ठोकले दंड

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राज्यातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेना यांच्या विरोधात शिवसेना (उध्दव ठाकरे) आणि मनसे यांची भगवी युती मैदानात उतरली आहे. दरम्यान, शिवसेना आणि मनसे तसेच समर्थक अपक्ष असे एकूण ९५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

‘शिवसेना'चे (ठाकरे गट) ऐरोली विधानसभा मतदारसंघ जिल्हाप्रमुख प्रवीण म्हात्रे आणि ‘मनसे'चे प्रवक्ते गजानन काळे यांनी ३ जानेवारी रोजी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ‘युती'ची घोषणा केली. नवी मुंबई महापालिका निवडणुकीत ‘शिवसेना उबाठा'चे ५६ आणि १४ अपक्ष बंडखोर तर ‘मनसे'चे २५ उमेदवार भाजपा-शिवसेना विरोधात लढणार आहेत. दुसरीकडे ‘महाविकास आघाडी'मधील मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत काही कारणास्तव युती होऊ शकली नाही. परंतु, आमच्यात मैत्रीपूर्ण लढत होईल. यावेळी लावा रे तो व्हिडिओ या राज ठाकरे यांच्या स्टाईलमध्ये गणेश नाईक यांनी सन-२०१५ निवडणुकीत नवी मुंबईकरांना दिलेल्या आश्वासनांचे व्हिडीओ पत्रकार परिषदेत दाखविण्यात आले. यात २४ तास पाणी पुरवठा, महापालिकेतील ठेकेदार पध्दतीवर काम करणाऱ्या कामगारांना समान काम समान वेतन दिलेले आश्वासन यासह शिक्षण, आरोग्य, परिवहन, पुनर्विकास, आदि मुद्दे निवडणूक प्रचारदरम्यान नागरिकांसमोरे ठेवणार, असे ‘युती'च्या वतीने सांगण्यात आले.

या निवडणुकीत आमची युती प्रामुख्याने शिंदे गट आणि भाजपा विरोधात लढणार असून काँग्रेस, राष्ट्रवादी विरोधात आम्ही प्रचार करणार नाही. आमची लढाई दल-बदलू, गद्दार आणि निष्ठावंत अशी राहणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, लवकरच ‘युती'चा जाहीरनामा प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

सदर पत्रकार परिषद प्रसंगी शिवसेना बेलापूर जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, महिला जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख अतुल कुळकर्णी, मनसे शहर सचिव सचिन कदम, आदि उपस्थित होते. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

नमुंमपा जिंकून शहर विकासाचा नवा अध्याय लिहिण्याची  संधी - प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण