‘केडीएमसी'ला अंधारात ठेवून ‘स्टेम प्राधिकरण'चे काम
‘भाजपा'चे केडीएमसी आयुक्तांना पत्र
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अ-प्रभाग क्षेत्रात मोहने पंप हाऊस शेजारी ‘स्टेम प्राधिकरण'ने ‘केडीएमसी'ला अंधारात ठेवून प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. सदर काम करण्यासाठी ‘केडीएमसी'कडून कोणतेही ना-हरकत प्रमाणपत्र घेण्यात आले नाही. त्यामुळे ‘केडीएमसी'चे नहरकत पत्र घेई पर्यंत ‘स्टेम प्राधिकरण'चे काम थांबविण्याची मागणी ‘भाजपा'ने केली आहे. याबाबत ‘भाजपा'चे मोहने टिटवाळा मंडळ सचिव सुशीलकुमार पायाळ यांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अ-प्रभाग क्षेत्रातील मोहने पंप हाऊस शेजारी उल्हास नदीवर स्टेम प्राधिकरण ठाणे महापालिका तसेच मिरा-भाईंदर महापालिकेच्या पाणी पुरवठ्यासाठी प्रकल्प राबवत आहे. परंतु, प्रकल्प राबवत असताना स्थानिक महापालिका प्रशासनाला ‘स्टेम प्राधिकरण'ने अवगत करुन देणे अपेक्षित होते. ‘स्टेम प्राधिकरण'ने कुठल्याही प्रकारे अद्यापपर्यंत सदर प्रकल्पाबाबत एकही पत्र ‘केडीएमसी'ला दिलेले नाही. तसेच ‘केडीएमसी'च्या कुठल्याही अधिकाऱ्याला प्रकल्पाबाबत लेखी स्वरुपात अवगत करुन दिलेले नाही.
‘स्टेम प्राधिकरण'चा प्रकल्प केडीएमसी हद्दीत येत असल्याने भविष्यात प्रकल्पाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अपघात झाल्यास किंवा कुठलीही आपत्ती आल्यास सर्वप्रथम विचारणा आयुक्तांना होईल. त्यामुळे या ‘प्राधिकरण'ला तात्काळ ‘केडीएमसी'ची ना-हरकत घेणे कामी सूचित करुन प्रकल्पाबाबत संपूर्ण माहिती ‘केडीएमसी'ला उपलब्ध करावी. तसेच स्टेम प्राधिकरण जोपर्यंत कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाची नहरकत प्राप्त करत नाही, तोपर्यंत ‘स्टेम प्राधिकरण'ला सुरु असलेले काम बंद करण्याचे आदेशित करावे. जेणेकरुन उद्या कुठल्याही प्रकारचा अपघात किंवा आपत्ती निर्माण झाल्यास आपण आयुक्त म्हणून जबाबदार राहणार नाही, असे सुशीलकुमार पायाळ यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
दरम्यान, ‘स्टेम'च्या वतीने सुरु असलेल्या कामासंदर्भात केडीएमसी पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता अशोक घोडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘स्टेम'च्या सुरु असलेल्या कामासंदर्भात आमच्या विभागाला पत्र प्राप्त झालेले नाही. संदर्भित परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्था ‘केडीएमसी'ला याबाबत स्टेम, लघु पाटबंधारे विभागाने समन्वय साधण्याच्या दुष्टीकोनातून कळविणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.