अंजुरफाटा चिंचोटी महामार्गावरील खड्डे, धुळीने नागरिक हैराण

भिवंडी : मानकोली अंजुरफाटा ते चिंचोटी या महामार्गाची सध्या प्रचंड दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून खड्ड्यातून उडणाऱ्या धुळीनेही आता प्रवासी हैराण झाले आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुरते दुर्लक्ष झाले आहे.

मानकोली अंजुरफाटा-चिंचोटी या रस्त्यावर नेहमी अवजड वाहनांची ये-जा असते. त्यामुळे या अवजड वाहनांच्या मागे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुळ उडत असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून धुळीमुळे या रस्त्यावरुन प्रवास करताना दुचाकीस्वारांना प्रचंड त्रास होत आहे. या रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी शासनाकडून निधी देखील मंजूर करण्यात आला असून ठेकेदाराने काम संथ गतीने सुरु केले आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी रस्ता चांगला होता. त्याच ठिकाणी ठेकेदाराने काँक्रेट कामाची सुरुवात केली असल्याने चांगला रस्ता खोदून ठेवला आहे. त्यामुळे बाजुच्या खड्डेमय रस्त्यावर प्रवास करतांना नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. ‘सार्वजनिक बांधकाम विभाग'ने या रस्त्याच्या कामाकडे विशेष लक्ष द्यावे आणि  ठेकेदाराने रस्ता काँक्रीट करताना बाजुचा खड्डेमय रस्ता आधी दुरुस्त करावा. त्यानंतरच दुसऱ्या बाजुने काँक्रेटीकरण सुरु करावे, अशी मागणी ग्राम पंचायत वडघरचे माजी सदस्य ॲड.नितीन पंडित यांनी केली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ई-गव्हर्नन्स सुधारणा मुल्यांकनात ‘नमुंमपा'ला राज्यस्तरीय चतुर्थ मानांकन