प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
उरण ः उरण पूर्व विभागातील वाहनांना आणि नागरिकांना दैनंदिन प्रवासासाठी मागील ३ वर्षांपूर्वी पाडण्यात आल्याने ‘मध्य रेल्वेे'च्या वतीने बांधण्यात येत असलेल्या गव्हाण फाटा - चिरनेर मार्गांवरील कंटेनर मालवाहतूक रेल्वे ओव्हरहेड पुलाचा उदघाटन सोहळा गव्हाणफाटा वाहतूक शाखेतील पोलीस उपनिरीक्षक राजाराम मांढरेकर यांच्या हस्ते आणि ‘मध्य रेल्वे'चे अधिकारी श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत १८ एप्रिल रोजी पार आला. गेली ३ वर्षे रखडपट्टीत अडकलेला रेल्वे क्रॉसिंगवरील सदर पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने या मार्गांवरील प्रवासी आणि वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे.
नवी मुंबई आणि उरण पूर्व विभागातील गावांना जोडणारा सदर पूल वाहतुकीस खुला झाल्यामुळे दैनंदिन ५ हजार प्रवासी आणि वाहन चालकांची प्रतिक्षा संपणार असून, मागील ३ वर्षांपासून दररोज होणारी गैरसोय दूर होणार असल्याने त्यांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे उरण पूर्व विभागातील चिरनेर, वेश्वी, चिर्ले, कळंबुसरे, आवरे वशेणी, केळवणे, कोप्रोली, खोपटा मार्गांवरील एसटी बस प्रवास सुरु होऊन रिक्षा आणि अन्य वाहनातून नागरिकांना पनवेल, मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे मार्गांकडे जाण्यासाठी सुलभ होणार आहे. अशातच कोकण परिसरात जाणाऱ्या अनेक चाकरमानी, नागरिक यांना येथील प्रवास सुखकर आणि सोपा बनला आहे. त्यामुळे वाहन चालक आणि प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेआहे.
सदर पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असल्याने ‘मनसे'चे तालुकाध्यक्ष अँड. सत्यवान भगत यांनी संबंधित प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत. यावेळी टीआयपीएल अभियंता सतिश उगले, क्षितिज पांडे, आनंद मोर्या, प्रताप साहू, संदीप बोर्डे, आर. जी. ठाकूर, गव्हाणफाटा वाहतूक शाखेचे पोलीस नाईक रुपेश दराडे आणि त्यांचे वाहतूक पोलिस सहकारी उपस्थित होते.