उत्सव गणरायाचा,जागर पर्यावरणाचा
पनवेल : पनवेल महापालिकेच्या वतीने यावर्षी दहा दिवसांच्या गणेशोत्सव काळात आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव गणरायाचा, जागर पर्यावरणाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांच्या सहभागामुळे कचऱ्याचे योग्य विभाजन याबाबतच्या जनजागृतीमुळे तब्बल ४३.९८ टन निर्माल्याचे संकलन केले आहे. महापालिकेने पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना राबवून राज्यात पर्यावरणभिमुख गणेशोत्सवाचा आदर्श घालून दिला आहे. यावर्षीच्या गणेशोत्सवात पनवेल महापालिकेच्या मार्फत निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये गणेशमूर्ती विसर्जनाला तसेच निर्माल्य संकलन रथास भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या सूचनेनुसार विविध उपक्रम राबविण्यात आले. त्याच अनुषंगाने गणेशोत्सव काळामध्ये श्रींच्या मूर्तीसोबत विसर्जनस्थळी आणले जाणाऱ्या श्री गणेश मूर्तीच्या गळ्यातील फुलांचे हार, सजावटीचे सामान पुष्पमाला, फुले, दुर्वा, शमी यासारखे पुनर्प्रक्रिया करण्यायोग्य निर्माल्य टाकण्यासाठी महापालिका मार्फत प्रत्येक विसर्जन ठिकाणी स्वतंत्र निर्माल्य कलशांची व्यवस्था करण्यात आली होती.
निर्माल्य नैसर्गिक किंवा कृत्रिम तलावामध्ये टाकण्यास महापालिका कडून प्रतिबंध करण्यात आला होता. या उपक्रमास गणेशभक्तांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून, विसर्जनवेळी घरगुती गणेशोत्सवातील निर्माल्य आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये दररोज निर्माण होणाऱ्या निर्माल्याचे संकलन ४ विशेष निर्माल्य संकलन रथाद्वारे करण्यात आले. निर्माल्य रथांच्या माध्यमातून गणशोत्सवाच्या कालावधीत जवळपास ४३ टन ९८० किलो निर्माल्य जमा झाले. संपूर्ण गणेशोत्सव कालावधीतील निर्माल्य जमा करुन निर्माल्य प्रक्रिया केंद्रांच्या ठिकाणी पोहोचवून त्यावर पर्यावरणपूरक प्रक्रिया राबविण्यात आली आहे.
पनवेल महापालिका नेहमीच पर्यावरण संरक्षणाला प्राधान्य देते. यावर्षी गणेश भक्तांकडून मिळालेल्या सहकार्यामुळे निर्माल्य संकलन आणि त्याच्या पर्यावरणपूरक प्रक्रियेमध्ये अपेक्षित यश मिळाले आहे. निर्माल्याचे खतामध्ये रुपांतर करुन महापालिकेच्या बगीचे आणि पार्क मधील झाडांसाठी याचा सुयोग्य वापर करण्यात येणार आहे. धार्मिक श्रध्दा जपत पर्यावरण संवर्धनाचा संदेश पोहोचविण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे.
-मंगेश चितळे, आयुवत-पनवेल महापालिका.