वायू, ध्वनी प्रदूषणाबाबत नियमांचे उल्लंघन

पनवेल : उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार तसेच पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी दिलेल्या निर्देशानुसार पनवेल महापालिका हद्दीतील बांधकाम प्रकल्पांवर वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि पर्यावरणीय नियमांच्या उल्लंघनाबाबत व्यापक तपासणी करुन कारवाई करण्यात आली. स्थळपाहणी अहवालानुसार एकूण ३४ बांधकामस्थळांवर कठोर कारवाई करण्यात आली असून सदर प्रकल्पांचे काम तात्काळ थांबविण्यात आले आहे.

यापूर्वी महापालिकेच्या वतीने एकूण १६९ बांधकाम प्रकल्पांना, स्थळांना उपाययोजना करण्याबाबत अथवा काम बंद करण्याबाबाबत इशारावजा जाहीर नोटीस देण्यात आलेली होती. संबंधित बांधकाम व्यावसायिकांना नोटीसा बजावण्यात आल्यानंतरही काही व्यावसायिकांनी अपेक्षित कार्यवाही न केल्याचे दिसून आले. त्यानंतर महापालिकेच्या पथकाने पुन्हा एकदा प्रत्यक्ष स्थळपाहणी करुन नियमांचे पालन होत आहे की नाही, याची तपासणी केली.

तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी धूळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना न करणे, बांधकाम साहित्य खुले ठेवणे, बांधकामाच्या ठिकाणी प्रदूषण करणाऱ्या साहित्यावर नियमाप्रमाने पाणी न शिंपडणे, वाहन स्वच्छता न करणे, तसेच ब्लास्टिंग करतानाच्या मानक कार्यपध्दतीचे पालन न करणे आदि गंभीर बाबी निदर्शनास आल्या.

त्याअनुषंगाने कळंबोली विभागातील १० बांधकाम प्रकल्प, कामोठे विभाग मधील ९ बांधकाम प्रकल्प, नवीन पनवेल- पनवेल विभागातील १५ बांधकाम प्रकल्प अशा एकूण ३४ बांधकाम प्रकल्पांवर कारवाई करण्यात आली आहे.

सदर कारवाईदरम्यान संबंधितांना तात्काळ सुधारात्मक उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन सुरुच राहिल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, नागरिकांचे आरोग्य, स्वच्छ हवा आणि पर्यावरण संरक्षण याबाबत पनवेल महापालिका कटिबध्द असून, यापुढेही अशा प्रकारच्या तपासण्या आणि कारवाई नियमितपणे सुरु राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री